
Rohit Pawar Meet Ajit Pawar : पोलीस तक्रार का घेत नाहीत? राज ठाकरेंनी दिले कायद्याचे दाखले | दोन दिवसांत रोहित पवार स्वतःचा ‘रिपोर्ट’ प्रसिद्ध करणार | मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याच्या मुदतीची आठवण
मुंबई :- अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत असताना, या प्रकरणातील गूढ उकलण्याऐवजी संशय अधिक वाढत चालला आहे. आमदार रोहित पवार यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या अपघातासंदर्भातील तांत्रिक माहिती आणि पुरावे सादर केले. पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यास नकार दिल्याने आता रोहित पवार यांनी जनमत आणि विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.


राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी अन् दिला कायद्याचा आधार
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “राज ठाकरेंनी माझी सर्व माहिती शांतपणे ऐकून घेतली. एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू होऊनही पोलीस एफआयआर का घेत नाहीत, यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. राज साहेबांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे दाखले देत स्पष्ट केले की, अपघाती मृत्यू झाल्यास एफआयआर घेणे हे पोलिसांवर बंधनकारक आहे आणि तो नागरिकांचा अधिकार आहे.” यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ यांना निर्वाणीचा इशारा
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अपघाताचा अहवाल एका महिन्याच्या आत देण्याचे आश्वासन दिले होते. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “आज आणि उद्या आम्ही या सरकारी अहवालाची वाट पाहणार आहोत. जर हा अहवाल ‘थातूरमातूर’ आला किंवा त्यात सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही.”
रोहित पवार स्वतःचा अहवाल मांडणार
केवळ सरकारी अहवालावर अवलंबून न राहता, रोहित पवार यांनी दोन दिवसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्वतः गोळा केलेली माहिती आणि अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. डीजीसीए (DGCA) विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत.
