मुंबई

Gas Crises Maharashtra : राज्यात गॅससाठी रांगाच रांगा! ‘नोटाबंदी’सारखी परिस्थिती; बीडपासून मुंबईपर्यंत नागरिकांचा संतापाचा कडेलोट

•घरपोच डिलिव्हरी बंद, बुकिंग नंबर नॉट रीचेबल; तीन-चार तास उन्हात उभे राहूनही सिलिंडर मिळेना

मुंबई :- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून एलपीजी गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिक पुन्हा एकदा लांबच लांब रांगांमध्ये उभे ठाकले आहेत. प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीबाहेरचे चित्र विदारक आहे. अनेक ठिकाणी पहाटे 5 वाजेपासून नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत, मात्र तासनतास वाट पाहूनही गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने जनतेचा संयम सुटत चालला आहे.

जिल्हानिहाय सद्यस्थिती: वास्तव काय आहे?

1.बीड आणि जालना: तातडीच्या उपाययोजनांची मागणी
बीड जिल्ह्यात गॅस एजन्सींनी घरपोच डिलिव्हरी पूर्णपणे बंद केली आहे. बुकिंगसाठी दिलेले फोन नंबर सतत बंद येत असल्याने नागरिकांना थेट एजन्सीवर धाव घ्यावी लागत आहे. जालन्यातील बदनापूर येथे तर एजन्सी उघडण्यापूर्वीच तोबा गर्दी होत असून, सिलिंडरच्या उपलब्धतेवरून ग्राह आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची व गोंधळ उडत आहे.

2.धुळे: पोलीस कुटुंबीयांचेही हाल
धुळ्यातील दक्षता गॅस एजन्सीवर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी दिसून आली. पंधरा दिवस उलटूनही गॅस मिळत नसल्याने शिवतीर्थ परिसरातील एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. नोंदणी असूनही घरपोच सेवा मिळत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

3.जळगाव (चाळीसगाव): कृत्रिम टंचाईचा आरोप
चाळीसगाव तालुक्यात गॅसची तीव्र टंचाई जाणवत आहे. काही ग्राहकांनी असा आरोप केला आहे की, जादा दर उकळण्यासाठी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. ऑनलाइन बुकिंगची सुविधा कोलमडल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

4.गडचिरोली: दुर्गम भागात मोठी कसरत
जिल्ह्यातील 70 टक्के नागरिक एलपीजीवर अवलंबून आहेत. गडचिरोली शहर, आष्टी, आलापल्ली आणि अहेरी यांसारख्या दुर्गम भागातही नागरिकांना सिलिंडरसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सतर्कतेचा उपाय म्हणून नागरिक आगाऊ सिलिंडर खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

5.मुंबई (कांदिवली पोईसर): झोपडपट्टी भागात सर्वाधिक फटका
कांदिवलीतील पोईसर या मोठ्या झोपडपट्टी भागात गॅस पाईपलाईन नसल्याने नागरिक पूर्णपणे सिलिंडरवर अवलंबून आहेत. येथे पहाटे 5 वाजल्यापासून लहान मुले, वृद्ध आणि महिला रांगेत उभे आहेत. गॅसची गाडी कधी येईल, याची कोणतीही निश्चित माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागरिकांच्या प्रमुख तक्रारी आणि मागण्या

ऑनलाइन यंत्रणा ठप्प: गॅस कंपन्यांचे बुकिंग ॲप आणि फोन नंबर काम करत नसल्याने गोंधळ वाढला आहे.

घरपोच सेवा: एजन्सी मालकांनी घरपोच सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी केली जात आहे.

पारदर्शकता: गॅसचा साठा किती आहे आणि तो कधी उपलब्ध होईल, याची स्पष्ट माहिती देण्याची गरज आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button