मनपा करणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन

आजारी कुत्र्यांच्या बाबतीत शहरामध्ये उपाययोजना सुरू
निलेश राऊत
पुणे: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत पुणे महापालिकेच्या वतीने असाध्य, आजारी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत उपाययोजनाही सुरू केल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका भोसले-पुंडे यांनी दिली.

दरम्यान, याबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार करूनही पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याबाबत पुंडे यांना विचारले असता त्यांनी सर्व तक्रारिंची दखल घेऊन त्याबाबत उपाययोजना केल्या जातील असे सांगितले आहे.
एकाही कुत्र्याचा नाही रेबीजने मृत्यू
शहरातील कुत्र्यांची २०२३ मध्ये गणना झाली होती. त्यावेळी ती संख्या एक लाख ८० हजारांच्या आसपास होती. मात्र, समाविष्ट गावांचा विचार ही संख्या अडीच लाखांच्या घरात जाते. नसबंदी, लसीकरण या सगळ्या उपाययोजनांवर भर दिला असून, या वर्षात शहरात एकाही कुत्र्याचा रेबिजने मृत्यू झाल्याची नोंद झाली नाही. मात्र, दोन रेबीजने आजारी असलेले कुत्रे सापडल्याचे डॉ. पुंडे यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये, मैदाने आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या कुत्र्यांची माहिती गोळा केली आहे.
जागृती निर्माण केली जात आहे
या विषयावर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांमध्येही जागृती निर्माण केली जात असून, माहिती गोळा केली जात आहे. या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी आणि त्यांच्या स्थानबद्धतेसाठी शेल्टरही बांधण्यात आले आहेत. तेथे त्यांचे लसीकरणही केले जाते. पकडलेल्या कुत्र्यांचे वय, वजन पाहता नसबंदीवर काहीअंशी मर्यादा येतात, असे डॉ. पुंडे यांनी नमूद केले.
शहरामध्ये रेबिजने नाही एकही मृत्यू
पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातून अनेक जण कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी येतात. सन २०२५ मध्ये शहरातील नागरिकाची जरी रेबीजने एकही मृत्यूची नोंद नसली, तरी बाहेरून शहरात उपचारासाठी आलेल्यांतील दहा जणांचा रेबीजने मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे.
पुणे न्यूज


