Pune Crime : २० वर्षांपासून फरार असलेला बलात्कार प्रकरणातील आरोपी परळीतून अटकेत
Pune Crime : येरवडा पोलिसांची कारवाई

Pune Crime :पुणे: गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या २० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला पुण्यातील येरवडा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून अटक केली आहे. नजीर मुस्तफा खान (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मजुरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा गती मिळाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६(अ) आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध फरार घोषित करण्याची प्रक्रिया केल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी येरवडा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.https://maharashtramirror.com/ Pune Crime
दरम्यान, आरोपी अंबड, जिल्हा जालना येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र आरोपी सापडला नाही. त्यानंतरही तपास सुरू ठेवण्यात आला. गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी सध्या परळी येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस अंमलदार संदीप जायभाये आणि साईनाथ मस्के यांनी परळी पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव नजीर मुस्तफा खान असे सांगितले. तो परळी येथील आयेशा कॉलनी परिसरात, उर्दू शाळेजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले होते. तो वारंवार आपला मोबाइल क्रमांक आणि राहण्याचे ठिकाण बदलत होता. तसेच, आपल्या भावासह इतर नातेवाइकांशी संपर्क टाळत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला परळी येथून येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात यश आल्याने येरवडा पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.


