Ashadhi Wari 2026: पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; यंदाची ‘सेवा वारी’
Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी मुक्कामाचे जय्यत नियोजन; २ हजार स्वच्छतागृहे तैनात
पुणे, महाराष्ट्र मिरर
Ashadhi Wari 2026 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांचा पवित्र आषाढी पालखी सोहळा आगामी ९ जुलै रोजी पुणे शहरात दाखल होत आहे. पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहणाऱ्या या सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदाची वारी ही ‘पुणेकरांची सेवा वारी’ म्हणून साजरी केली जाणार असून, महापालिकेने या संदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ashadhi Wari 2026 pune palkhi sohala-pmc seva wari)

या पत्रकार परिषदेला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महापौरांनी वारीच्या नियोजनाचा सविस्तर आराखडा जाहीर करत शहरातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना या सेवाकार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. (Ashadhi Wari 2026 )
२४ तास पाणीपुरवठा आणि भव्य जर्मन हँगर मंडप
पालखी मुक्कामाच्या काळात वारकऱ्यांची निवास व्यवस्था उत्तम व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने वारी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी एकूण १९५ विशेष मंडप उभारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पालखी मुक्कामाच्या मुख्य ठिकाणी ४० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर तब्बल ६ भव्य ‘जर्मन हँगर’ मंडप उभारण्यात आले आहेत, जेणेकरून वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळेल आणि आरामदायी विश्रांती घेता येईल.(Ashadhi Wari 2026 )
तसेच, पालखी शहरात असेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात २४ तास अखंडित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे फिरते टँकर पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.
२ हजार स्वच्छतागृहे अन् मुबलक प्रकाश व्यवस्था
“स्वच्छता आणि आरोग्य ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, वारी मार्गावर यंदा २ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेषतः महिला वारकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून पालखी मार्गावरील खाजगी शाळा, कंपन्या आणि संस्थांना त्यांची स्वच्छतागृहे महिलांसाठी खुली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या खाजगी स्वच्छतागृहांच्या नियमित सफाईची जबाबदारी महापालिका स्वतः उचलणार आहे. (Ashadhi Wari 2026 )
तसेच, रात्रीच्या वेळी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सायंकाळपासूनच वारी मार्गावर अतिरिक्त आणि मुबलक प्रकाश व्यवस्था (फ्लड लाईट्स) कार्यान्वित करण्यात येणार आहे. संपूर्ण पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त, सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
१८० फिजिओथेरोपिस्ट आणि ४० आरोग्य पथके तैनात
लाखो वैष्णवांची पावले पंढरीच्या दिशेने चालत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेने यंदा अभूतपूर्व वैद्यकीय यंत्रणा उभी केली आहे. वारी मार्गावर वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि पायांच्या उपचारासाठी तब्बल १८० फिजिओथेरोपिस्ट तैनात असणार आहेत. (Ashadhi Wari 2026 )
Landslide : Varandha Ghat Traffic Paralyzed on Pandharpur-Mahad Highway
याव्यतिरिक्त वैद्यकीय सुविधांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
वैद्यकीय किट्स: वारीतील विविध दिंड्यांना एकूण ४०० मेडिकल किट्सचे वाटप केले जाईल. यातील प्रत्येक किटमध्ये १०० जणांना पुरेल इतका औषधसाठा असेल.
आरोग्य पथके व रुग्णवाहिका: वारीच्या मार्गावर शहरात ४० फिरती आरोग्य पथके आणि ४० अत्याधुनिक रुग्णवाहिका (Ambulances) २४ तास सज्ज राहतील. (Ashadhi Wari 2026 )
वैद्यकीय मदत केंद्र: शहरातील विविध ठिकाणी ४० वैद्यकीय तपासणी कक्ष (Medical Booths) उभारले जात आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील १०० विद्यार्थी आणि ६ नामांकित खाजगी वैद्यकीय सेवा संस्थांचे डॉक्टर व कर्मचारी या कार्यात अहोरात्र सेवा देतील.
यंदा वारीमध्ये ‘कला वारी’चा अनोखा रंग
यंदाच्या ‘सेवा वारी’ला सांस्कृतिक आणि शैक्षणिक जोड देण्यासाठी महापालिकेने ‘कला वारी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत शहरातील महापालिकेच्या आणि खाजगी शाळांमध्ये ‘पालखी सोहळा’ या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तब्बल ४ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.
शाळा स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या ५ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके दिली जाणार असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला महापालिकेचे डिजिटल प्रमाणपत्र थेट शाळेमार्फत वितरित केले जाईल. यासोबतच १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी वारीवर आधारित विशेष वेशभूषा स्पर्धाही घेतली जाणार असून, संपूर्ण पालखी मार्गावर आकर्षक सजावट केली जाणार आहे.
महापौरांचे पुणेकरांना आणि संस्थांना जाहीर आवाहन
पत्रकार परिषदेच्या शेवटी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणेकर नागरिकांना शिस्त आणि भक्तीचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी खालील प्रमुख मुद्यांवर भर दिला:
१० जुलै रोजी सामूहिक पसायदान: १० जुलै रोजी रात्री ठीक ९ वाजता संपूर्ण पुणे शहरात सामूहिक ‘पसायदान’ उपक्रम राबवला जाईल. सर्व दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच सर्व पुणेकरांनी आपापल्या घरी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे नियोजन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज देवस्थानच्या विश्वस्तांच्या संमतीने करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/reel/DaSTxPGNAk_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
लाऊडस्पीकर आणि डीजेंना बंदी: पालखीच्या पारंपारिक भजनी वातावरणाला आणि वारकऱ्यांच्या विश्रांतीला बाधा पोहोचू नये म्हणून पालखी मार्गावर कोणालाही लाऊडस्पीकर किंवा डीजे (DJ) लावण्यास सक्त मनाई असेल. (Ashadhi Wari 2026 )
*पुणेकरांचा सहभाग: महापालिकेच्या हजारो स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच शहरातील महाविद्यालयीन तरुण, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन वारकऱ्यांची मनोभावे सेवा करावी आणि या ‘सेवा वारी’चे साक्षीदार व्हावे.
पुणे महानगरपालिकेने स्थायी समिती आणि विरोधी पक्षांना सोबत घेऊन यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी अत्यंत काटेकोर आणि वारकरी-स्नेही नियोजन केले असून, पुणे शहर या भक्ती सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.


