पुणे
पूर्व भागामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणारी पाईपलाईन होणार स्थलांतरित
पुणे, निलेश राऊत : रेल्वेमार्गावरील साधू वासवानी उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणारी पाईपलाईन स्थलांतरित करण्यासाठी लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून येरवडा येथील ठाकरसी टाकीला केला जाणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. २ जून रोजी शहराच्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून ठाकरसी टाकीला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर या टाकीवरून शहराच्या पूर्व भागाला पाणी वितरित केले जाते. या केंद्रातील टाकीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन रेल्वे मार्गावरील साधू वासवानी उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही पाईपलाईन स्थलांतरित करण्यासाठी २ जूनला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण येरवडा परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.


