Pune Crime : तीन प्रकरणांमध्ये ३७ लाखांची फसवणूक
Pune Crime : चिखली, निगडी आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Pune Crime :पिंपरी: फसवणुकीच्या तीन प्रकरणांमध्ये ३७ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली. शेअर ट्रेडिंग आणि कंपनीचा माल पोहोचवण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) चिखली, निगडी आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने महिलेची लाखांची फसवणूक
ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून सात लाख २४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत लक्ष्मी चौक, देहू-आळंदी रोड, चिखली येथे घडली. या प्रकरणी ४० वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर मार्केटच्या ॲपद्वारे २४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २४ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला अनोळखी महिलेने व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून ॲपमध्ये नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर्स खरेदी-विक्रीतून मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडत फसवणूक केली. ही घटना २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान आकुर्डी पोस्ट ऑफिस जवळ, प्राधिकरण निगडी येथे घडली. मनोज अरविंद चव्हाण (४६, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईलधारक अज्ञात महिला, ॲप्लिकेशन वापरकर्ता आणि ज्या बँक खात्यांवर पैसे गेले ते अज्ञात खातेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाचा अपहार करून गाडी सोडून चालक फरार
कंपनीचा माल सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी असताना मालाची परस्पर विल्हेवाट लावून गाडी रस्त्यात सोडून चालक फरार झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी खराबवाडी ते महाळुंगे मार्गावर उघडकीस आली. तुषार बाळासाहेब खराबी (४३, रा. ता. खेड) यांनी याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राहुल भवानी सिंग राजपूत (३३, रा. जि. सागर, मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मालकीच्या गाडीत ५ लाख २२ हजार २२१ रुपये किमतीचे सामान भरून गाडी आरोपी चालकाच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, आरोपीने तो माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता परस्पर विल्हेवाट लावली आणि गाडी मोशी टोलनाक्याजवळ सोडून पळ काढला. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी: पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भक्ती शक्ती ब्रिजखाली, निगडी येथे करण्यात आली.
इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुश्ताख शेख (२७, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल म्हस्के यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्तियाज याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी मार्च २०२५ मध्ये पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. तरीही तडीपारीचा आणि शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग करून तो शहरात आला व त्याने कोयता जवळ बाळगला. निगडी पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.


