मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : ‘नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर बोचरी टीका

Sanjay Raut On Gas Cylinder : माझ्या पत्नीलाही दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये”; आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयशामुळेच देशावर ही परिस्थिती आल्याचा घणाघात

मुंबई :- आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेली इंधन आणि गॅस टंचाई आता राजकीय वादाचे केंद्र बनली आहे. देशभरात गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि कोलमडलेली वितरण व्यवस्था यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. “लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भाजपचा छंद आहे,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

घरातील परिस्थितीचा दाखला

संजय राऊत यांनी गॅस टंचाईची दाहकता सांगताना स्वतःच्या घराचे उदाहरण दिले. “माझ्या घरातही हीच परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये. महानगर गॅसची जोडणी असली तरी सिलेंडरची गरज सर्वांनाच लागते. आज सकाळपासून मला 60-70 लोक भेटले, जे सिलेंडर कुठे मिळेल हे विचारत होते,” असे राऊत म्हणाले.

‘नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब’चा नारा

दिल्लीत सध्या “नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब” अशी घोषणा दिली जात असल्याचे सांगत राऊतांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. “नोटबंदीच्या काळात जशा रांगा लागल्या होत्या आणि त्यात लोक मारले गेले, तशीच भयंकर स्थिती आता सिलेंडरच्या बाबतीत निर्माण झाली आहे. जम्मूपासून चेन्नईपर्यंत संपूर्ण देश रांगेत उभा आहे,” असा दावा त्यांनी केला.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयश

आखाती देशांतील युद्धामुळे निर्यात थांबली असून शेतकऱ्यांचा माल सडत आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “हे सरकार आंतरराष्ट्रीय राजकारणात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज देशातील जनतेला तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे आणि हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लागत आहे.”

कोविड काळातील व्यवस्थापनावरून टोला

पंतप्रधानांनी ‘कोविडप्रमाणे ही परिस्थिती सांभाळून घेऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यावर राऊतांनी खोचक टोला लगावला, “हो, कोविड काळात त्यांनी देश कसा सांभाळला हे सर्वांनी पाहिले आहे. गंगा नदीत प्रेते वाहत होती आणि स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती. काय सांभाळले यांनी?” असा रोकठोक सवाल त्यांनी विचारला.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button