पुणेमहाराष्ट्र

हांडेवाडीचा ‘जलआक्रोश’!

२७ कोटींचा कर भरूनही कोरडे घसे; १८ सोसायट्यांचा पुणे महापालिकेविरोधात बेमुदत एल्गार

“कर घ्यायचा बंद करा, नाहीतर पाणी द्या”;

हांडेवाडी चौकात नागरिकांचा ठिय्या; प्रश्न आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार

पुणे: “स्मार्ट सिटी”च्या चकचकीत घोषणा एका बाजूला आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची नामुष्की, अशा दुहेरी कात्रीत हडपसर मतदारसंघातील हांडेवाडी-उंड्री येथील नागरिक अडकले आहेत. दरवर्षी तब्बल २७ कोटी रुपयांचा कर भरूनही पाणी, वीज आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतापलेल्या शेकडो नागरिकांनी आज हांडेवाडी चौकात बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रभाग क्रमांक ४१ मधील सुमारे १८ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील प्रतिनिधी या लढ्यात सहभागी झाले आहेत.

प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पाढा
आंदोलनकर्त्यांच्या मते, वारंवार निवेदने देऊन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही महापालिका केवळ आश्वासन देत आली आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना टँकर लॉबीच्या दावणीला बांधले गेले आहे. पाणी टाकीमधून पाणी न मिळणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि रस्त्यांवर साचणारे ड्रेनेजचे दूषित पाणी यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

आंदोलनातील ३ प्रमुख मागण्या
१. नवीन सब-स्टेशन: शहरी भागात वारंवार जाणारी वीज रोखण्यासाठी तातडीने नवीन सब-स्टेशन उभारण्यात यावे.
२. सुरळीत पाणीपुरवठा: पाणी टाकीमधून संपूर्ण परिसराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा.
३. ड्रेनेजचे काम: हांडेवाडी परिसरातील प्रलंबित ड्रेनेजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.

शिवसेनेचे आंदोलनाला पाठबळ
या आंदोलनात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न थांबवता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून हांडेवाडीतील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “जोपर्यंत पाणी, वीज आणि स्वच्छतेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील,” असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

लढ्यात सहभागी प्रमुख सोसायट्या
सिंपली सिटी, मॅजेस्टिक रिदम काऊंटी, ओरिएंट पॅलेस, किंग्स्टन ऑरा, व्यंकटेश क्लासिक, धनश्री आनंद, मावेन्स, फॉर्च्युन इंप्रेस, स्वप्नपूर्ती, सिल्वर स्टोन, फॉर्च्युन सिद्धीप्रिया, लश लाईफ, धनश्री अशियाना, अट्रिया ग्रँडे, मंत्रा सेन्सेस, निको बेमाउन्ट, धनश्री आंगण आणि कॅसलिनो टॉवर्स.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button