Nitesh Kumar : बिहारमध्ये ‘नितीश’ पर्वाचा शेवट? नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, मुलाकडे उपमुख्यमंत्रिपद; भाजपचा मुख्यमंत्री होणार?

Nitesh Kumar Latest News : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये राजकीय भूकंप | पुत्र निशांत कुमार यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब | 5 मार्चच्या नामांकनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
ANI :- बिहारच्या राजकारणात गेली दोन दशके प्रभाव गाजवणारे मुख्यमंत्री नितीश कुमार Nitesh Kumar आता राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असून, बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी, त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री करून सत्तेत मोठी भागीदारी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
नितीश कुमार राज्यसभेवर का?
बिहारमध्ये राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत असून, एनडीएच्या वाट्याला 4 जागा येण्याची चिन्हे आहेत. भाजपने आधीच आपले दोन उमेदवार (नितीन नवीन आणि शिवेश कुमार) जाहीर केले आहेत. उर्वरित दोन जागांपैकी एका जागेवर नितीश कुमार स्वतः अर्ज दाखल करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. उद्या,5 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने आज रात्रीपर्यंत यावर अंतिम मोहोर उमटण्याची शक्यता आहे.
पुत्र निशांत कुमार यांचा ‘राजकीय उदय’
आजवर राजकारणापासून दूर राहिलेले निशांत कुमार आता सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत. जेडीयूच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले असून, त्यांना उपमुख्यमंत्री करून बिहारमध्ये एक नवीन नेतृत्व तयार करण्याचा नितीश कुमार यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे. “निशांत कुमार हे सुशिक्षित इंजिनिअर असून कार्यकर्त्यांचीही तशीच मागणी आहे,” असे विधान जेडीयू नेत्यांनी केले आहे.
भाजपचा मुख्यमंत्री कोण?
नितीश कुमार दिल्लीत गेल्यास बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा असलेला पक्ष असल्याने मुख्यमंत्रिपदावर भाजप दावा करेल. अशा स्थितीत भाजप एखाद्या अनुभवी चेहऱ्याला मुख्यमंत्रिपदी बसवून निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून सोबत घेण्याची रणनीती आखत आहे.
एनडीएची उमेदवार यादी:
भाजप: नितीन नवीन (राष्ट्रीय अध्यक्ष) आणि शिवेश कुमार.
जेडीयू: नितीश कुमार (संभाव्य) आणि रामनाथ ठाकूर.
इतर: उपेंद्र कुशवाहा (रालोमो) यांना पाचव्या जागेसाठी पाठिंबा मिळण्याची शक्यता.



