पगार पालिकेचा, काम नेत्यांच्या घरी

घनकचरा विभागातील ४० टक्केच कर्मचारी कामावर; अहवालानंतरही कार्यवाहीकडे पालिकेचे दुर्लक्ष
१० हजार ६९ कर्मचारी नेमले आहेत. साडेचार हजार कर्मचारी इतर विभागात वेगवेगळी कामे करत आहेत व यांतील ४५० ते ५०० कर्मचारी हे आमदार, नगरसेवकांच्या घरी चालक ते अन्य मजूर म्हणून त्यांच्याकडील खासगी कामांसाठी जुंपलेले आहेत..
निलेश राऊत
पुणे: शहर स्वच्छता, तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने कायमस्वरूपी आणि ठेकेदारांचे असे १० हजार ६९ कर्मचारी नेमले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांतील तब्बल साडेचार हजार कर्मचारी इतर विभागात वेगवेगळी कामे करत आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे या साडेचार हजार कर्मचाऱ्यांमधील ४५० ते ५०० कर्मचारी हे आमदार, नगरसेवकांच्या घरी चालक ते अन्य मजूर म्हणून त्यांच्याकडील खासगी कामांसाठी जुंपलेले आहेत. त्यामुळे पगार महापालिकेचा आणि काम नेत्यांचे, असा कारभार सध्या सुरू आहे.

पालिकेला या सर्व प्रकारची माहिती असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाने याचा अहवाल तयार केला होता. तसेच, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि विद्यमान आयुक्तांनाही याची माहिती दिली होती. मात्र, यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.
राजकीय दबावापोटी कारवाई नाही
घनकचरा व्यवस्थापन विभागाने मागील वर्षी याची माहिती संकलित केली होती. अनेक कर्मचारी पालिकेचे वेतन घेत असले तरी पाच ते दहा वर्षांहून अधिक काळ ते राजकीय नेत्यांच्या घरी काम करीत असल्याचे आढळले. अशा कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी आणणे आवश्यक होते. मात्र, ही माहिती असूनही प्रशासनाने राजकीय दबावापोटी कारवाई केलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या
घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या सहा महिन्यांत अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने कोणताही अधिकारी कारवाईसाठी धजावत नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास घनकचरा व्यवस्थापन सक्षमपणे कसे चालणार, असा प्रश्न आहे.
दरम्यान याची माहिती घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्याचा जुना अहवाल असल्यास त्याचीही तपासणी केली जाईल. त्यानंतर कारवाई निश्चित केली जाईल. कोणालाही सोडणार नाही. असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.


