Pune Crime News : पुण्यात केसांचा टोप घालून घरफोड्या; सराईत टोळी जेरबंद : ३७ लाखांचा ऐवज जप्त

सहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीसह चौघांना अटक; शहरातील घरफोडी-चोरीच्या ९ गुन्ह्यांचा उलगडा Pune Crime News
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News पुणे शहरात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला. गेल्या सहा महिन्यांपासून विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या सराईत आरोपीसह चौघांना उंड्री-पिसोळी परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. तपासात पुणे शहरातील नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, आरोपींकडून सुमारे ३७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. Pune Crime News, Maharashtra Mirror
शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६, रा. एकता नगर, बडोदा, गुजरात), अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२, रा. बिराजदार नगर, हडपसर) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर/तीलपिटीया (वय २२, रा. एकता नगर, बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित उंड्री-पिसोळी परिसरात असल्याची माहिती मिळाली. आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांनी परिसर पिंजून काढत त्यांच्यावर पाळत ठेवली.
आरोपी रेनॉल्ट क्विड कारमधून उंड्री-पिसोळी येथील डोंगराच्या रस्त्याने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनांच्या मदतीने त्यांच्या कारला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर छापा टाकून चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संबंधित गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात टोळीचा शहरातील आणखी गुन्ह्यांमध्ये सहभाग समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पाच, काळेपडळ पोलीस ठाण्यातील दोन तसेच विश्रांतवाडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. यामध्ये घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींकडून जवळपास ३७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत. Pune Crime News
Aundh District Hospital ICU : औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या ICU चे महागडे साहित्य गेले कुठे?

