क्राईम न्यूजपुणे

शिरूर तालुक्यात अनोळखी पीडीएफ फाईल उघडताच मोबाईल हॅक

सात लाखांहून अधिक रकमेचा बँक खात्यातून अपहार

पुणे: मोबाईलवर आलेल्या अनोळखी पीडीएफ फाईलवर नजरचुकीने क्लिक करणे शिरूरमधील एका कॉम्प्युटर ऑपरेटरला भलतेच महागात पडले आहे. अज्ञात भामट्याने या फाईलच्या माध्यमातून पीडित तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या संमतीशिवाय बँक खात्यातील तब्बल ७ लाख १३ हजार ८५४ रुपये ऑनलाईन पद्धतीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगाराविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन घटना, गुन्हा दाखल
याबाबत विजय बाळासाहेब जाधव (वय ४१, व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. रामलिंग, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६, ६६(अ), ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना १३ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मौजे रामलिंग येथे ऑनलाईन माध्यमाद्वारे घडली.
भामट्याने राजेंद्र नवगिरे यांच्या नावाने पाठवली फाईल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जाधव हे रामलिंग येथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. बुधवार (ता. १३) रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर राजेंद्र नवगिरे नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दाखवणाऱ्या ९३२५१९७८४४ या क्रमांकावरून एक फाईल आली. ती ‘अनोळखी पीडीएफ फाईल’ असल्याचे ठाऊक नसताना विजय यांच्याकडून नजरचुकीने ती फाईल उघडली (ओपन झाली) गेली.

अनधिकृत प्रवेश करून मिळवली गोपनीय माहिती
ती पीडीएफ फाईल उघडताच आरोपीने मालवेअरच्या माध्यमातून फिर्यादीच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने अनाधिकृत प्रवेश (रिमोट ॲक्सेस) मिळवला. त्यानंतर आरोपीने विजय जाधव यांच्या मोबाईलमधील त्यांचे बँक खाते, ओटीपी, पासवर्ड आणि इतर गोपनीय आर्थिक माहिती चोरली. या गोपनीय माहितीचा वापर करून आरोपीने विजय जाधव यांचा मोबाईल क्रमांक पूर्णपणे हॅक केला.

टप्प्याटप्प्याने बँक खाते केले रिकामे
मोबाईलवर ताबा मिळवल्यानंतर सायबर भामट्याने फिर्यादी जाधव यांच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने पैसे वर्ग केले. आरोपीने एकूण ७ लाख १३ हजार ८५४ रुपये ऑनलाईन व्यवहाराद्वारे काढून घेऊन आर्थिक अपहार व फसवणूक केली. खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेज पाहिल्यानंतर फिर्यादी यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून आपले खाते ब्लॉक केले आणि पोलिसांत धाव घेतली.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button