पुणे

Pune News : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचा भक्तीचा महासागर; अथर्वशीर्ष पठणाने पुणे दुमदुमले

Pune News : ऋषीपंचमीनिमित्त भव्य अथर्वशीर्ष पठण सोहळा; पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी साधला भक्तीचा जागर



Pune News : पुणे :
“गणपती बाप्पा मोरया”, “ॐ नमस्ते गणपतये” आणि “ॐ गं गणपतये नमः”च्या जयघोषाने मंगळवारी पहाटे पुण्याचा आसमंत दुमदुमून गेला. ऋषीपंचमीनिमित्त “:”श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या भव्य अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात तब्बल ३५ हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेत गणरायाच्या चरणी भक्तीची अनाखी वारी अर्पण केली.
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने उत्सव मंडपापासून नानावाड्यापर्यंतचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटेच्या या सोहळ्याला पावसाचे वातावरण असतानाही महिलांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नाही.


मध्यरात्रीपासूनच महिलांची गर्दी


कार्यक्रमस्थळी महिलांनी मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. शंखनादाने सोहळ्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर ओंकार जप, गणेशगीत आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण भक्तिमय झाले.
हजारो महिलांनी एकाच सुरात अथर्वशीर्षाचे पठण करत गणरायाला नमन केले. “मोरया मोरया, दगडूशेठ मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि श्रद्धा या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
सामूहिक अथर्वशीर्ष पठणानंतर झालेल्या महाआरतीने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली. यावेळी उपस्थित महिलांनी गणरायाच्या चरणी सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.


४१ वर्षांची भक्तीची परंपरा


अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे हे ४१ वे वर्ष आहे. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३५ हजारांहून अधिक महिलांच्या सहभागामुळे यंदाच्या सोहळ्याने गर्दीचा नवा उच्चांक गाठला.
घराघरांत विराजमान झालेल्या गणरायाच्या भक्तीचा उत्साह आणि पुण्याच्या समृद्ध सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. पहाटेपासूनच संपूर्ण परिसरात घुमणारा अथर्वशीर्षाचा सामूहिक स्वर आणि गणरायाच्या जयघोषाने पुण्याच्या गणेशोत्सवातील भक्तीचा अविस्मरणीय अनुभव उपस्थितांना दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button