महाराष्ट्र

Washim News : वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोठा राडा; समृद्धी महामार्ग रोखणाऱ्या आमदार नितीन देशमुखांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

•”तुटपुंजी मदत नको, हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या; पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट.”

वाशिम :- अतिवृष्टी आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असून, शासनाकडून घोषित करण्यात आलेली 5 हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या मागण्यांसाठी आक्रमक होत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले.

शेतकऱ्यांना तातडीने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी समृद्धी महामार्गावर उतरले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून आधीच दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाची परवानगी नसतानाही ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत महामार्ग रोखून धरला.

पोलिसांचा लाठीचार्ज; आमदार नितीन देशमुखांसह कार्यकर्ते ताब्यात

समृद्धी महामार्ग अचानक रोखल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये मोठी झटापट उडाली. या आंदोलनादरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी कठोर भूमिका घेत आमदार नितीन देशमुख यांच्यासह प्रमुख आंदोलक व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button