Pune Crime : गंभीर गुन्हे असलेले १० सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार
Pune Crime : परिमंडळ-२ पोलिसांची धडक कारवाई
Pune Crime :पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ-२ च्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक मोठी व महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विविध गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या एकूण १० सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
या गुन्हेगारांवर दरोडा टाकणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवणे, बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री करणे, मारहाण, शिवीगाळ, मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी घेणे, जबरी चोरी आणि खून यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही प्रतिबंधक कारवाई केली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वेषणाखाली ६ गुन्हेगार आणि कलम ५५ अन्वेषणाखाली ४ गुन्हेगार अशा एकूण १० जणांवर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश उर्फ बटन प्रकाश बांडीलकर (वय २०), रामेश्वर लक्ष्मण करे (वय २५), गणेश तमाराम जाधव (वय २३) आणि आदित्य उर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २३); बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिकेत विजय कोंढरे (वय २२); तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरण दत्तात्रय पांगारे (वय २३) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
तसेच, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका संघटित गुन्हेगारी टोळीवरही कलम ५५ नुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये टोळी प्रमुख विकास अनिल जाधव (वय २८), आणि टोळीचे सदस्य विवेक रमेश शेवाळे (वय २४), गणेश उर्फ चिराग सचिन बडगुजर (वय २२) व ओंकार अनंत बहिरट (वय २३) यांना देखील पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही धडक कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२ चे पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते यांनी पूर्ण केली आहे. आगामी काळातही परिमंडळ-२ हद्दीतील रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कडक व ठोस प्रतिबंधक कारवाई सातत्याने सुरूच राहणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


