पुणेसामाजिक

Social News : स्वतःचे व्हिजन ठेवा, सद्‌विवेक फॉलो करा

तुकाराम मुंढे यांचे ‘जेन झी’ला आवाहन

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : ‘प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्‌विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,’ अशा शब्दांत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘जेन झी’ पिढीला ‘बी युवरसेल्फ’चा मंत्र दिला. ‘वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,’ अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली.Social News

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली. तुकाराम मुंढे यांचे वरिष्ठ बंधू अशोक मुंढे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील गाडवे, वी फाऊंडेशनच्या शामला देसाई, आम्रपाली चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते.

‘बीए झाल्यानंतर एमए राज्यशास्त्र प्रवेशासाठी मी पहिल्यांदाच ‘लालपरी’ एसटीने पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर बसस्थानकावरून पुणे विद्यापीठात पायी गेलो. प्रवेश मिळत होता, परंतु वसतिगृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या सायंकाळी मला निराश होऊन परत जावे लागले. नंतर यूपीएससीच्या तयारीदरम्यान जयकर ग्रंथालय आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात अभ्यास केला. मित्राच्या खोलीवर ‘पॅरासाईट’ म्हणून राहताना ढेकणांमुळे रात्र-रात्र झोप यायची नाही. त्या काळात चायनीज गाड्यांवर मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एमए’ करताना परिस्थितीमुळे ऑम्लेट-पाव आणि फरसाण-केळी हेच ‘स्टेपल डाएट’ होते. आता मी ते ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर माझा घसा बसेल,’ अशी आठवण सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.Social News

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांबाबत बोलताना त्यांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून न घेण्याची सडेतोड भूमिका मांडली. ‘भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. ‘एफडीए’ने तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू केला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हायकोर्टाच्या कँटीनपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र नियमानुसारच तपासणी सुरू आहे. अन्न उद्योगाने नियमांचे पालन करणे, एफडीएने नियमन करणे आणि ग्राहकांनी सजग राहणे यातूनच ही व्यवस्था बदलेल.’

कोणत्याही व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे. व्यवस्थेने नियमांनुसार काम केले पाहिजे. अधिकारी येतील-जातील; मात्र, व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी उत्तरदायित्व आणि कार्यपद्धतीची संस्कृती विकसित झाली पाहिजे. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.

तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button