सहा वर्षांपासून खराडी पोलिसांना चकवा देणारा खुनाचा मुख्य आरोपी जेरबंद

गुन्ह्यातील आठ आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती
पुणे: खराडी येथील कॉर्नेट लॉजमधून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. खराडी पोलीस ठाण्याच्या रात्रपाळी पथकाने उबाळे नगर परिसरात सापळा रचून या सराईत गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेतले. खुनासह ‘मोक्का’च्या गुन्ह्यातही तो पोलिसांना हवा होता.

तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये खून, दरोडा आणि अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आठ आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती, मात्र मुख्य सूत्रधार तेजस ढेरे हा सहा वर्षांपासून परागंदा होता.
राहुल शेलार खून प्रकरण
ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. खटाव, जि. सातारा) यांचे खराडीतील कॉर्नेट लॉज येथून अपहरण केले होते. आरोपींनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि कार असा ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. त्यानंतर राहुल शेलार याची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह नदीच्या पात्रात फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३९६ आणि २०१ नुसार गुन्ह्यात वाढ केली होती.
पहाटेच्या सुमारास थरारक कारवाई
शनिवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास खराडी पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय खरपुडे आणि अशोक केदार हे गस्त घालत असताना त्यांना तेजस ढेरे हा खराडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ‘प्यासा हॉटेल’च्या मागे सापळा रचला. यावेळी तेजस ढेरे याला त्याच्या सँट्रो कारसह (MH-05-AB-2604) ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची आणि सहा वर्षांपासून फरार असल्याची कबुली दिली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक केलेला तेजस ढेरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि ‘मोक्का’, शिरूर पोलीस ठाण्यात दरोडा आणि मुंढवा पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक संतोष म्हेजे, राहुल कोळपे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
The main accused in the murder case, who had been evading the Kharadi police for six years, has been arrested.


