दौंडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार

गप्पा मारत बसलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
पुणे: दौंड शहरातील गोवागल्ली (संभाजीनगर) परिसरात सोमवारी मध्यरात्री एका तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. घराबाहेर बसून आपल्या बहिणीशी आणि मावशीशी गप्पा मारत असताना, आरोपीने मागून येऊन तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार केले.

जिवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दौंड पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राहुल कुमार गायकवाड असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोनी शाम जाधव (वय ३०, धंदा घरकाम, रा. गोवागल्ली, संभाजीनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाहीद शेख (रा. भीमनगर, दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सोमवारी (ता. ४) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली.
गप्पा मारत असताना अचानक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी जाधव, त्यांची मावशी यलोबाई आणि भाऊ राहुल गायकवाड हे रात्री घरासमोर खुर्च्या टाकून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी परिसरात शांतता होती. अचानक आरोपी शाहीद शेख हा मागच्या बाजूने तिथे आला. राहुलचे लक्ष नसताना आरोपीने हातातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर समोरच्या बाजूला जोरदार वार केले.
जिवे मारण्याचा प्रयत्न
आरोपीने एकापाठोपाठ एक कुऱ्हाडीचे वार केल्याने राहुल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरडाओरडा झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जखमी राहुलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दौंड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


