क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

खराडीतील पीजीत ३ लाखांची चोरी; सोन्याची चेन, लॅपटॉप गायब

उघड्या दरवाजावाटे शिरून चोरट्याने ऐवज लांबवला

पुणे: खराडी परिसरातील एका खासगी पेईंग गेस्ट (PG) मध्ये राहणाऱ्या तरुणीच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा राहिल्याची संधी साधून चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने खोलीतून पावणेतीन तोळ्यांची सोन्याची चैन आणि लॅपटॉप असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी (ता. १९) रात्री ते सोमवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान विठ्ठल नगर येथे हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील विठ्ठल नगरमधील ‘फर्स्टक्लास पीजी’ मध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी रविवारी रात्री आपल्या खोलीत (S-2) असताना तिने आपली बॅग टेबलवर ठेवली होती. रात्रीच्या वेळी खोलीचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिला. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने खोलीत चोरपावलांनी प्रवेश केला.

चोरट्याने बॅगेत ठेवलेली २ लाख ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १० हजार रुपयांचा लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तरुणीला जाग आली असता बॅग आणि त्यातील साहित्य गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिने तातडीने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

खराडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार खरपुडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी किंवा खोलीतून बाहेर पडताना दरवाजा नीट बंद असल्याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Rs 3 lakh stolen from PG in Kharadi; Gold chain, laptop missing

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button