पुणे

Pune News : नाट्यतरुणाईचा जल्लोष! ‘पुरुषोत्तम करंडक’च्या अंतिम फेरीत नऊ संघांची निवड

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : नाट्यप्रेमी तरुण-तरुणींची उत्सुकता ताणणाऱ्या आणि प्रायोगिक एकांकिका क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या ६१ व्या वर्षाची प्राथमिक फेरी अत्यंत उत्साहात पार पडली. यंदा नऊ सर्वोत्कृष्ट संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे ‘अरे आवाज कुणाचा’ या तरुणाईच्या बुलंद जयघोषात आणि नाट्यगृहातील जल्लोषात रविवारी (दि.३०) प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून तब्बल ५१ संघांच्या सादरीकरणातून नऊ सर्वोत्कृष्ट संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या शनिवार, दि. ५ आणि रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

१६ ते ३० ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या प्राथमिक फेरीत यंदा पुणे शहर आणि परिसरातील ५१ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. रंगभूमीवर नवे विषय, प्रायोगिक तंत्र, सामाजिक आशय आणि तरुणाईचे ज्वलंत प्रश्न मांडणाऱ्या या एकांकिकांचे परीक्षण ज्येष्ठ नाट्यधर्मी श्रीपाद जोशी, प्रसाद शिरगांवकर आणि अमृत सामक यांनी केले. परीक्षणानंतर नऊ संघांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि संहितांच्या ताकदीने अंतिम फेरीत स्थान मिळवले.https://maharashtramirror.com/ Pune News

नेहमी अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या आणि पुरुषोत्तमच्या मंचावर वर्चस्व गाजवणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, बी. जे. मेडिकल कॉलेज, आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय यांसारख्या नामांकित महाविद्यालयांचे सादरीकरण यंदा अपेक्षेप्रमाणे न झाल्याने परीक्षकांनी त्यांना ‘दर्जा खालावलेले संघ’ म्हणून घोषित केले.यामुळे यंदाची अंतिम फेरी नव्या आणि तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या महाविद्यालयांमधील संघात अधिक रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ आणि ६ सप्टेंबरला भरत नाट्य मंदिरात रंगणाऱ्या अंतिम फेरीत कोणता संघ मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पटकावणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेले महाविद्यालय आणि एकांकिका

१. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, पुणे – एकांकिका: ‘गॅट मॅट’ २. मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड – एकांकिका: ‘नातीगोती’ ३. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय – एकांकिका: ‘मुक्ताक्षरे’ ४. भारती विद्यापीठाचे फाईन आर्टस् महाविद्यालय – एकांकिका: ‘लाजाळू’ ५. मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय – एकांकिका: ‘स्किम’ ६. सर परशुरामभाऊ (एस.पी.) महाविद्यालय – एकांकिका: ‘ईमान’ ७. कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगर – एकांकिका: ‘एरर : ह्युमन डिटेक्टेड’ ८. अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर – एकांकिका: ‘आठवडे बाजार’ ९. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी – एकांकिका: ‘इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी’.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button