वाघोलीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गुन्हे शाखेकडून एकासह तिघे अल्पवयीन ताब्यात
पुणे: वाघोली-लोहगाव रस्त्यावर मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ७ ला यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणासह तीन विधीसंघर्षित बालकांना (अल्पवयीन) ताब्यात घेतले आहे.

अमित प्रकाश कावरे (वय १९, रा. साई पार्क, गणेश मंदिराजवळ, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तोडफोड आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मध्यरात्री निर्माण केली होती दहशत
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) पहाटे तीनच्या सुमारास वाघोली-लोहगाव रस्त्यावरील ‘मोरया फॅशन’ गल्लीत चार अनोळखी इसमांनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, युनिट ७ चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
तपासादरम्यान पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, तोडफोड करणारे संशयित आरोपी वाघोलीतील जाधव वस्ती (भावडी रोड) परिसरात आले आहेत. या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचला आणि चौघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वाघोलीत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली.
या आरोपींविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(४), ३(५), मुंबई पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना वाघोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार सारंग दळे, निलेश साळवे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे आणि नितीन धाडगे यांच्या पथकाने केली.
Gang vandalizing vehicles busted in Wagholi


