Pune News : पुढील काही दिवस महापालिका यंत्रणेची मोठी कसोटी
आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचा जर्मनी दौरा
Pune News पुणे: महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी आलेल्या रजा आणि परदेश दौऱ्यांमुळे येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेच्या प्रशासकीय कामांचा भार कमालीचा वाढणार आहे. ५ ऑक्टोबरपासून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर जर्मनी दौऱ्यावर जात असल्याने पालिकेतील उच्चस्तरीय निर्णयप्रक्रिया आणि आपत्कालीन यंत्रणेची मोठी परीक्षा लागणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सध्या महापालिका आयुक्त नवलकिशोर राम शहरात कार्यरत असले, तरी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे १२ ऑक्टोबरपर्यंत रजेवर आहेत. दुसऱ्या बाजूला, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हे पुणे-ओकायामा मैत्री व सहकार्य कराराच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ओकायामा परिषदेसाठी जपान दौऱ्यावर गेले आहेत. प्रजीत नायर ५ ऑक्टोबर रोजी शहरात परतणार असले, तरी तोपर्यंत वरिष्ठ पातळीवर पोकळी निर्माण झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर १ ऑक्टोबर रोजी प्रशासकीय कामासाठी मुंबईत होत्या. २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान सलग शासकीय सुट्ट्या आल्याने या काळात मुख्यालयातील सर्वोच्च अधिकारी अनुपलब्ध आहेत. त्यातच ५ ऑक्टोबरपासून आयुक्त राम आणि अतिरिक्त आयुक्त कौर यांचा जर्मनी दौरा सुरू होणार असल्याने मुख्यालयातील मुख्य प्रशासकीय साखळीच विस्कळित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सामान्यतः आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अनुपस्थित असताना प्रशासकीय समन्वय व महत्त्वाच्या निर्णयांची जबाबदारी शहर अभियंत्यांकडे सोपवली जाते. परंतु शहर अभियंता अनिरुद्ध पावसकरही जपान दौऱ्यावर असल्याने पर्यायी व्यवस्था कोणाकडे सोपवायची, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात नवीन कामे, निविदा आणि निधी वितरणाबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. अशा नाजूक काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरी समस्या, दैनंदिन कामकाज, आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


