Pune news : स्वारगेटमध्ये ६ किलो गांजासह दोघांना अटक पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; ४.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune news : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्वारगेट बसस्थानक परिसरातील पार्किंगमध्ये विक्रीसाठी गांजा बाळगल्याच्या आरोपावरून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक दोनने २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या या कारवाईत ६ किलो २० ग्रॅम गांजा, दोन मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख २६ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.https://maharashtramirror.com/ Pune news
संशयावरून झडती; गांजाचा साठा आढळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि पथकातील कर्मचारी पुणे शहरात गस्त घालत होते. या वेळी स्वारगेट बसस्थानकाजवळील पार्किंगमध्ये दोन संशयित आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवलेला ६ किलो २० ग्रॅम गांजा आढळून आला.
४.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ३ लाख १ हजार रुपये किमतीचा गांजा, २५ हजार रुपये किमतीचे मोबाइल फोन आणि १५५ रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आशिष रमेश शिंदे (वय २१, रा. अप्पर, बिबवेवाडी) आणि आशितोष ऊर्फ स्वप्निल सोमनाथ कांबळे (वय २७, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ नुसार अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्याच्या (एनडीपीएस) कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांच्यासह पोलीस अंमलदार योगेश कुंभार, संदीप देवकाते, सतीश चव्हाण, सुमित यादव, शरद धांडे, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर, सुरेखा साबळे, अजिंक्य जोजारे, देविदास वांढरे आणि दिनेश बास्टेवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.


