Pune News : साखरेचे दर घसरले; दोन आठवड्यांत किलोमागे १२ ते १५ रुपयांची घट
Pune News : केंद्राच्या कठोर उपाययोजनांचा परिणाम; किरकोळ दर ६० रुपयांच्या खाली
स्मिता कुलकर्णी
Pune News पुणे : गेल्या महिन्यात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर केंद्र सरकारने केलेल्या कठोर उपाययोजनांचा परिणाम आता बाजारात दिसू लागला आहे. गेल्या दोन आठवड्यांत साखरेच्या दरात किलोमागे तब्बल १२ ते १५ रुपयांची घट झाली असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात दर झपाट्याने खाली येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
जुलैमध्ये सुमारे ४९ रुपये किलो असलेला साखरेचा किरकोळ दर ऑगस्टमध्ये ६५ ते ६७ रुपयांपर्यंत पोहोचला होता. देशातील साखर उत्पादनाचा अंदाज ३४३ लाख टनांवरून ३०६ लाख टनांपर्यंत घटल्याने बाजारात टंचाईची भीती निर्माण झाली होती. त्याचा फायदा घेत काही साखर कारखान्यांकडून साठेबाजी होत असल्याचा आरोप करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
केंद्र सरकारचे कठोर पाऊल
साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये साखर कारखान्यांची प्रत्यक्ष तपासणी, १० लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी आणि घाऊक व्यापारी व मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
याशिवाय, मासिक कोट्याऐवजी पंधरवडा कोटा लागू करण्यात आला असून, १ सप्टेंबरपासून पहिल्या आठवड्यात निश्चित साठ्यापैकी ४० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक करण्यात आले. निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या ३.५ लाख टन साखरेला देशांतर्गत बाजारात विक्रीची परवानगी देण्यात आली.
मिल गेट दरात मोठी घसरण
सरकारी उपाययोजनांनंतर साखरेच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. मिल गेटवरील दर ६५०० रुपये क्विंटलवरून सुमारे ४८०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच किलोमागे जवळपास १७ रुपयांची घट झाली आहे.
घाऊक बाजारातही साखरेचा दर ६०.३९ रुपयांवरून ५७.६२ रुपये किलोपर्यंत घसरला आहे. तर किरकोळ बाजारातील दर ६५.०८ रुपयांवरून ५९.५७ रुपये किलोपर्यंत खाली आला असून, गेल्या चार दिवसांपासून किरकोळ दर ६० रुपयांच्या खाली आहेत.
जुन्या साठ्यामुळे किरकोळ दर घटण्यास वेळ
किराणा दुकानदारांकडे जुन्या दराने खरेदी केलेला महागडा साठा शिल्लक असल्याने किरकोळ बाजारातील दर घाऊक बाजाराच्या तुलनेत काहीसे उशिराने कमी होत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत जुन्या साठ्याची विक्री झाल्यानंतर किरकोळ दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्राहकांनी साखरेचा अनावश्यक साठा करून घाबरून खरेदी करू नये. देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, केंद्राच्या उपाययोजनांमुळे बाजारातील पुरवठा सुरळीत होत असल्याचे चित्र आहे.
“गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात लक्षणीय घट झाली असून, घाऊक बाजारातील दरही सातत्याने खाली येत आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. साखरेचा पुरवठा सुरळीत झाल्याने दरवाढीची परिस्थिती आता कमी झाली आहे. सुरुवातीला उत्पादन घटण्याच्या अंदाजामुळे बाजारात टंचाईची भीती निर्माण झाली होती आणि त्याचा परिणाम दरांवर झाला. मात्र, आयातीला परवानगी, साठा मर्यादा आणि अतिरिक्त साखर बाजारात उपलब्ध करून दिल्याने परिस्थिती सुधारली आहे. किरकोळ बाजारात जुन्या दराने खरेदी केलेला साठा असल्याने दर कमी होण्यास थोडा वेळ लागत आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ दर आणखी स्थिर होण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहकांनी घाबरून साखरेचा अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही. बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.”
— मुकेश गोयल मार्केटयार्ड व्यापारी


