सुनेत्रा पवारांचा देशात महाविक्रम

पोटनिवडणुकीत मोडले अजितदादांचे सर्व रेकॉर्ड
२ लाख १८ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय; प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, बिचुकले-मुंडेंना मिळालेल्या मतांची सर्वत्र चर्चा
पुणे: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या निवडणुकीत केवळ विजयच मिळवला नाही, तर मताधिक्याचा एक असा डोंगर उभा केला आहे, जो आजवर भारतीय विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात कोणालाही सर करता आलेला नाही. २४ व्या फेरीअखेर आलेल्या निकालानुसार, सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत उत्तर प्रदेशातील सुनील कुमार शर्मा यांचा २ लाख १४ हजारांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे.

बारामतीकरांनी आपल्या लाडक्या ‘वहिनीं’च्या पारड्यात भरभरून मते टाकत अजितदादांच्या २०१९ मधील १ लाख ६५ हजार मताधिक्याचा विक्रमही इतिहासजमा केला आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभे राहिलेल्या एकाही उमेदवाराला साधी हजाराची मतसंख्याही पार करता आली नाही. चुरशीची लढत देण्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांना केवळ १२५ मते मिळाली, तर नेहमी चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले यांना अवघ्या १२१ मतांवर समाधान मानावे लागले.
बारामतीमधील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, ज्याचा परिणाम आज निकालाच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून आला. जय आणि पार्थ पवार यांनी प्रचारात लावलेली ताकद आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेले काम यामुळे हा ‘मॅजिक फिगर’ गाठणे शक्य झाले आहे.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना पार्थ पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “आज आम्ही रेकॉर्ड मतांनी निवडून आलो आहोत, त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. पण मुळात आम्हाला या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. आज जरी विजयाचा ऐतिहासिक रेकॉर्ड झाला असला, तरी आमच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हा आनंदाचा किंवा जल्लोषाचा दिवस नाही. त्यामुळे कोणीही गुलालाची उधळण करू नये किंवा मिरवणुका काढू नयेत,” असे आवाहन त्यांनी केले.
आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः बारामतीत ‘जनता दरबार’ घेईन आणि लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर देईन, असेही पार्थ पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांनी देखील सोशल मीडियाद्वारे बारामतीकरांचे आभार मानले असून हा विजय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित केला आहे. “बारामतीकरांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्यासाठी समर्पित आहे. हा विजयाचा शेवट नसून, ही तर एका नव्या बारामतीची, संघर्षाची आणि विकासाच्या निर्धाराची सुरुवात आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी संयम राखावा आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करून जल्लोष टाळावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या विजयामुळे सुनेत्रा पवार आता देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदार ठरल्या असून, बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे


