विदर्भात आगडोंब! ब्रह्मपुरीत विक्रमी ४७.१ अंश तापमानाची नोंद

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र अवकाळी पावसाचा इशारा
पुणे: राज्यात एकाच वेळी हवामानाची दोन परस्परविरोधी रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भात सूर्याचा कोप सुरू असून तापमानाने चाळीशी पार करत भीषण रूप धारण केले आहे, तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) पुणे केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत दैनिक अहवालानुसार, गेल्या २४ तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे तब्बल ४७.१ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली असून हे सध्या राज्यातील सर्वात जास्त तापमान ठरले आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली असून नागरिकांना दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर दुसरीकडे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान पूर्णपणे कोरडे नोंदवले गेले. कमाल तापमानाचा विचार केला तर विदर्भात सरासरी तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाडा आणि कोकण-गोव्यातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ नोंदवली गेली.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, लोहगाव परिसरात पारा थेट ४०.० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मुंबईच्या कुलाबा येथे ३४.६ अंश तर सांताक्रूझ येथे ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
२७ मे पासून येथे हवामान कोरडे
आगामी काही दिवसांच्या हवामान अंदाजाचा विचार करता, २३ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २४ ते २६ मे दरम्यान या तिन्ही विभागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर २७ मे पासून येथे हवामान कोरडे राहील. याउलट, विदर्भाची परिस्थिती अत्यंत बिकट असणार आहे. २२ आणि २३ मे रोजी विदर्भात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी अत्यंत तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता आहे. तसेच तेथे ‘उबदार रात्रींची’ (Warm Nights) स्थिती निर्माण होणार असल्यामुळे रात्रीच्या वेळीही उकाडा असह्य होईल. २४ ते २८ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- अतिउष्ण शहरे (४४ अंशांच्या पार): ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४६.८, नागपूर ४६.६, वर्धा ४६.४, अमरावती ४५.८, गोंदिया ४५.२, यवतमाळ ४५.०, अकोला ४४.९ आणि परभणी ४४.०.
- इतर प्रमुख शहरे: जळगाव ४२.०, छत्रपती संभाजीनगर ४१.८, मालेगाव ४१.२, बुलढाणा ४१.०, सोलापूर ४०.९, धाराशिव ४०.६, लोहगाव ४०.०, अहिल्यानगर ३९.८, सातारा ३८.९, सांगली ३८.५, पुणे ३८.२, नाशिक ३६.४, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर २९.६, मुंबई (सांताक्रूझ) ३४.७, मुंबई (कुलाबा) ३४.६ आणि पणजी (गोवा) ३४.४.
पुणे न्युज


