पिंपरी चिंचवडपुणे

Pimpari News : भाजे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना हादरा! कर थकबाकीवर सहा जण अपात्र


Pimpari news : वाल्हेकरांचा ‘राजकीय षडयंत्राचा’ आरोप, तर ग्रामसेवकांचा कारवाईला दुजोरा

Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायत कर वेळेत न भरल्याच्या प्रकरणात सरपंच, उपसरपंचासह तब्बल सहा ग्रामसदस्य अपात्र ठरले आहेत. मात्र, या कारवाईवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एका बाजूला कर वेळेत न भरल्याचे मान्य करत, अपात्र ठरलेले ग्रामसदस्य विकास वाल्हेकर यांनी ही कारवाई राजकीय आकसापोटी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसरीकडे, भाजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा प्रशासन अधिकारी गजानन जाधव यांनी सहा जणांना अपात्र ठरवण्याचा निकाल प्राप्त झाल्याचे मान्य केले आहे.https://maharashtramirror.com/ pimpari news

कर थकबाकी आणि अपात्रतेची कारवाई


भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, तसेच विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे या सहा जणांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याचा मुद्दा या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी याबाबत विवाद अर्ज दाखल केला होता. प्रकरणाची सुनावणी आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी सहा जणांना अपात्र ठरवण्याचा निकाल दिला.https://maharashtramirror.com/ Pimpari news

विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा दावा


या निर्णयावर विकास वाल्हेकर यांनी आपली बाजू मांडताना कर वेळेत भरला गेला नसल्याचा मुद्दा नाकारलेला नाही; मात्र या कारवाईमागे राजकीय आकस असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. विरोधकांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचं षडयंत्र रचल्याचा दावा वाल्हेकर यांनी केला आहे. त्यामुळे हा केवळ कर थकबाकीचा विषय नसून, त्यामागे स्थानिक राजकारण आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari news

वाल्हेकर यांचा हा आरोप असला, तरी प्रशासनाची बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. भाजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा प्रशासन अधिकारी गजानन जाधव यांनी सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आणि निकाल मिळताच ग्रामसेवक तथा प्रशासन अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल साद केल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. आता भाजे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबतची पुढील कार्यवाही वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari news

वाद चिघळणार?


मात्र, या प्रकरणाला आता आणखी एक कायदेशीर वळण मिळालं आहे. अपात्र ठरवण्यात आलेले हे सहा सदस्य पुढील कायदेशीर पर्यायाचा अवलंब करणार असल्याची भूमिका समोर आली आहे. त्यामुळे भाजे ग्रामपंचायतीतील हा वाद इतक्यात थांबण्याची चिन्हं नाहीत. एकीकडे प्रशासनाकडून अपात्रतेच्या निकालाची पुष्टी, दुसरीकडे विकास वाल्हेकर यांचा राजकीय आकस आणि षडयंत्राचा आरोप, आणि त्यातच पुढील कायदेशीर लढाईची तयारी. त्यामुळे आता प्रश्न केवळ सहा सदस्यांच्या अपात्रतेपुरता राहिलेला नाही.

भाजे ग्रामपंचायतीचा कारभार कोणाच्या हाती जाणार? प्रशासक नेमला जाणार का? सहा सदस्यांच्या अपात्रतेनंतर स्थानिक राजकीय समीकरणं कशी बदलणार? आणि वाल्हेकर यांनी केलेल्या राजकीय षडयंत्राच्या आरोपावर विरोधकांची भूमिका काय असणार? कर थकबाकीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट भाजे ग्रामपंचायतीच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे… त्यामुळे येत्या काळात भाजे ग्रामपंचायतीत आणखी काय घडामोडी घडतात, याकडे मावळचे लक्ष लागले आहे. भाजे ग्रामपंचायतीचा हा वाद आता नेमका कुठे जाऊन थांबतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button