क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane News : येऊरच्या जंगलात माकडांवर धनुष्य-बाणाने जीवघेणे हल्ले; वनविभागाकडून आरोपीची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस जाहीर

Thane Latest Crime News: सलग दोन क्रूर घटनांनी ठाणे हादरले; वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुपित

ठाणे (येऊर) :- ठाण्याचे वैभव असलेल्या येऊर वनक्षेत्रात वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत येऊर परिसरात माकडांवर धनुष्य-बाणाने जीवघेणे हल्ले करण्याच्या सलग दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. या क्रूर कृत्यामुळे निसर्गप्रेमी आणि प्राणिमित्रांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वनविभागाने अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रकरणातील आरोपीची खात्रीशीर माहिती देणाऱ्या नागरिकास 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

येऊर जंगलालगतच्या भागात शिकार किंवा क्रूरतेच्या उद्देशाने माकडांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. रविवारी एका माकडाच्या गळ्यातून बाण आर-पार गेल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले, तर शुक्रवारी देखील एका माकडाच्या पायात बाण घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दोन्ही घटनांमध्ये बाण शरीरातून आर-पार गेल्याने या हल्ल्यांची तीव्रता भीषण असल्याचे स्पष्ट होत आहे. जखमी झालेली माकडं ही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची-1 मधील संरक्षित प्राणी असल्याने या प्रकरणाला कायद्याने अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. वन विभाग आणि स्थानिक प्राणी प्रेमी संघटनांच्या मदतीने जखमी माकडांवर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

येऊर परिसरात रात्रीच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्या, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि लखलखाट यामुळे आधीच वन्यजीवांच्या अधिवासात अडथळा निर्माण होत आहे. त्यातच आता थेट शस्त्रांनी हल्ले होऊ लागल्याने वनसंपदेवर मोठे संकट उभे राहिले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी वनक्षेत्रपाल संतोष डगळे आणि वनपाल सी. जे. खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तत्काळ वनविभागाला कळवावी.

नागरिकांनी आरोपींना पकडण्यासाठी सतर्क राहून वनविभागाला मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर कोणाकडे यासंदर्भात काही माहिती असेल तर त्यांनी ९८९२६८४२६६ किंवा ९३७०११४३९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. पर्यावरणीय संतुलनावर परिणाम करणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने आता परिसरात गस्तही वाढवली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button