क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

बाणेरमध्ये तरुणाला सायबर चोरट्यांनी १५ लाखांना ठगवले

अमेरिकन बाजारपेठेत व्यवसायाचे आमिष दाखवले

पुणे: जागतिक पातळीवरील नामांकित ‘अॅमेझॉन’ कंपनीच्या माध्यमातून अमेरिकन बाजारपेठेत (युएस मार्केट) व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून पाषाणमधील एका तरुणाची १५ लाख ५० हजार ९१४ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सायबर भामट्यांनी गुगल मीटिंगद्वारे तरुणाचा विश्वास संपादन करून हा मोठा आर्थिक डल्ला मारला आहे.

याप्रकरणी सुतारवाडी (पाषाण) येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक, लिंक पाठवणारे आणि बँक खाते धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुगल मीटिंगद्वारे जिंकला विश्वास
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी ते १२ एप्रिल या कालावधीत ही फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी फिर्यादीला फोन करून अॅमेझॉन कंपनीच्या अमेरिकन बाजारपेठेत व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध सेवा पुरवल्या जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर गुगल मीटिंग घेऊन त्यांना कंपनीच्या सेवा, उत्पादनांची सूची (कॅटलॉग) आणि त्यातून मिळणारा संभाव्य नफा या संदर्भात सविस्तर सादरीकरण करून त्यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.

लिंक पाठवून उकळले पैसे
व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेसाठी आणि अन्य शुल्कासाठी आरोपींनी फिर्यादीला विविध लिंक पाठवल्या. त्या लिंकवर माहिती भरण्यास सांगून फिर्यादीला विविध बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडले. फिर्यादीने आतापर्यंत १५ लाख ५० हजार ९१४ रुपये भरले, मात्र कोणताही व्यवसाय किंवा परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेमुळे आयटी परिसरात खळबळ उडाली असून बाणेर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग या गुन्ह्याचा अधिक तपास करत असून नागरिकांनी ऑनलाईन व्यवसायाच्या ऑफर्सला भुलू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button