Amravati News : पराभव जिव्हारी लागला? संगीता शिंदेंचं स्टेटस चर्चेत; म्हणाल्या, ‘शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली’
Amravati News : अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे (बोंडे) यांच्या सोशल मीडिया स्टेटसनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मतमोजणीच्या कलांमध्ये त्या पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत असताना त्यांनी शिक्षकांचे आभार मानत केलेल्या पोस्टमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. निवडणुकीतील पिछाडीमुळे त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/Amravati News
महायुतीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर संगीता शिंदे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र, जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
‘शिक्षकांनी माझी काय किंमत आहे, हे दाखवून दिले’; संगीता शिंदेंचं स्टेटस चर्चेत
मतमोजणी सुरू असतानाच संगीता शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
“आदरणीय गुरुजन धन्यवाद, आज खूप आनंद झाला, मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिले,” असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे.
त्यांच्या या विधानाचा संबंध निवडणुकीतील कामगिरीशी जोडला जात असून, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, त्यांच्या पोस्टमागील नेमकी भावना स्पष्ट झालेली नाही.
किरण सरनाईक आघाडीवर; अदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीनंतर महायुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवली होती. काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे दुसऱ्या, तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर होते.
१९व्या फेरीअखेरची मतांची स्थिती पुढीलप्रमाणे होती.
किरण सरनाईक (शिवसेना-महायुती) : ९,१६८ मते
अदिती पोहरे (काँग्रेस) : ५,५०८ मते
श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर) : ५,२०२ मते
संगीता शिंदे (बोंडे) : २,११२ मते
या आकडेवारीनुसार किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांच्यावर ३,६६० मतांची आघाडी घेतली होती. संगीता शिंदे यांना तुलनेने कमी मते मिळाल्याने त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचं चित्र दिसत होतं.
काल विजयाचा विश्वास व्यक्त केला होता
मतमोजणीपूर्वी संगीता शिंदे यांनी आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला होता. “शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट होणार, या निवडणुकीत माझा विजय होईल,” असं विधान त्यांनी केलं होतं.
तसंच, “माझ्यावर देवाभाऊंचाही आशीर्वाद होता. माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत होता. मी नक्की विजयी होईल,” असंही त्या म्हणाल्या होत्या.
मात्र, मतमोजणीच्या कलांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्याने त्यांच्या आधीच्या विधानांची आणि आताच्या स्टेटसची चर्चा सुरू झाली आहे.
विजयासाठी किती मतांचा कोटा आवश्यक?
अमरावती शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणत्याही उमेदवाराला आवश्यक विजयी कोटा पूर्ण करता आला नव्हता. त्यामुळे नियमानुसार दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होती.
उपलब्ध माहितीनुसार, विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा आवश्यक होता. १९व्या फेरीअखेर किरण सरनाईक यांना ९,१६८ मते मिळाली होती. त्यामुळे त्यांना विजयी कोटा गाठण्यासाठी आणखी ६,९६६ मतांची आवश्यकता होती.
आता दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत कोण बाजी मारणार आणि अंतिम निकालात कोणाच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार, याकडे राजकीय वर्तुळासह शिक्षकांचं लक्ष लागलं होतं.


