पथविक्रेत्यांना उष्णतेची पूर्वसूचना देणे आवश्यक

‘जाणीव’ची मागणी : महापालिकेने जबाबदारी घ्यावी
निलेश राऊत
पुणे: उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक मोठा फटका रस्त्यांवर असणाऱ्या पथविक्रेत्यांना बसत आहे. व्यवसायावर तर अनिष्ट परिणाम होत आहेच, शिवाय प्रकृती अस्वास्थ्यालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी किमान अशा लाटांची पूर्वसूचना मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी जाणीव संघटनेने केली आहे. महापालिका याचा सहानुभूतीने विचार करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

जाणीव शहरातील पथविक्रेत्यांची सर्वांत जुनी संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय शंके देशातील पथविक्रेत्यांच्या संघटनेवर काम करतात. तर राज्यस्तरीय संयुक्त फेरीवाला कृती समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की देशात, राज्यात सगळीकडेच झपाट्याने हवामानबदल होत आहे. त्याची आगाऊ अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उष्णतेच्या लाटांनी संपूर्ण राज्य होरपळत आहे. याचा सर्वात जास्त त्रास रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना होत असतो. त्यांचा व्यवसाय कमी होतो, तरीही काही चारदोन ग्राहक मिळतील म्हणून भरउन्हात ते काम करतात. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडते व समस्या वाढतात.
यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना संभाव्य उष्णतेच्या लाटांची किमान माहिती दिली जावी, अशी अपेक्षा शंके यांनी व्यक्त केली. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. उष्णतेपासून बचाव होईल, असे कापडी किट त्यांना दिले जावे.
Street vendors must be given advance warning of heat


