Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार का? संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली
•हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवायची असेल तर ते स्पष्ट करावे. यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई :- हरियाणातील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे राऊत म्हणाले होते. यावर आता काँग्रेस हायकमांडने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांनी त्यांच्या या विधानाविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना छेडले असता त्यांनी या प्रकरणी संजय राऊत यांच्याशी संवाद साधला जाईल असे स्पष्ट केले. आज आमची संजय राऊत यांच्यासोबत बैठक आहे. तिथे आम्ही त्यांना विचारू. त्यानंतर मिळून भूमिका घेऊ. त्यांचा अग्रलेख वस्तुस्थितीला धरून होता की मुद्दामहून लिहायचा म्हणून लिहिला हे आम्ही त्यांना विचारू. आम्ही महाराष्ट्रात जे काही समन्वयाने काम करत आहोत, त्याचा अर्थ त्यांनी चांगलाच घेतला पाहिजे असा आमचा त्यांना सल्ला आहे.
हरियाणातील काँग्रेसच्या हाराकिरीनंतर महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली का? असा प्रश्न यावेळी पटोले यांना विचारण्यात आला असता असे काहीही नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. हा बार्गेनिंग पॉवरचा विषय नाही. महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच आम्ही मेरिटनुसार निर्णय घेण्याची भूमिका घेतली. त्यानुसार आम्ही आमचे निर्णय घेत आहोत. जागावाटपही मेरिटच्या आधारावरच होणार.
पत्रकारांनी यावेळी संजय राऊत यांच्या महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अजूनही जागृत असल्याच्या विधानाकडे नाना पटोले यांचे लक्ष वेधले. त्यावर नाना पटोले म्हणाले, आम्ही कुठे नाही म्हणालो. पण त्यांना हे बोलावे का लागते? हा एक प्रश्न आहे.