Mumbai Drug News : अमली पदार्थ तस्करांवर राज्यात प्रथमच ‘सुधारित मोक्का’ कायद्यान्वये कारवाई

Mumbai Bandra Drug Seller Arrested : वांद्रे येथे तिघांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपी फरार, एका महिलेसह दोघांना अटक
मुंबई :- राज्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या पावलांनंतर, अशा गुन्हेगारी टोळीवर सुधारित मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. वांद्रे येथील अमली पदार्थ विरोधी कक्षाने ही ऐतिहासिक कारवाई केली असून, टोळीतील तिघा आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी जुलै 2025 मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार वांद्रे येथील अमली पदार्थ विरोधी कक्षाने ऑगस्ट महिन्यात जमीर अहमद अब्दुल खालीद अन्सारी उर्फ बोका याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. जमीर उर्फ बोका नवनवीन टोळ्या बनवून स्थानिक पातळीवर अमली पदार्थांचा पुरवठा आणि विक्री करीत होता. Mumbai Bandra Police Latest News
पोलिसांनी जमीर उर्फ बोका आणि त्याचे दोन साथीदार अदनान आमीर शेख आणि कायनात जब्बार शेख यांच्याविरोधात मोक्का कायद्यातील कलम 3 (1), 3 (2), 3 (4) आणि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
या टोळीचा सूत्रधार जमीर उर्फ बोका सध्या फरार आहे, मात्र त्याचे दोन साथीदार अदनान आमीर शेख आणि कायनात जब्बार शेख (महिलेचा समावेश) यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात मोक्काच्या सुधारीत कायद्यानुसार राज्यातील हा पहिलाच गुन्हा असून, यामुळे अमली पदार्थ विरोधी कारवायांतील कठोरता अधोरेखित झाली आहे. फरार सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.



