शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार नाहीत! शेवटपर्यंत सक्रिय राहतील; फडणवीसांचा विश्वास
पवारांच्या कार्यशैलीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
1 मिनिट वाचन

नागपूर, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय राहतील आणि कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवून ठेवतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर भाष्य केले.
हाती आलेल्या वृत्तानुसार, शरद पवार १२ डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या वृत्तानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार का, याबाबतही राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. ते आजही राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये लक्ष घालत असून विविध प्रकल्पांमध्ये त्यांना विशेष रस आहे. पवारांना जवळून पाहण्याची संधी मिळाली असून त्यांची काम करण्याची पद्धत पाहता ते सहजासहजी थांबतील, असे वाटत नाही. पवारांच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे घाईचे ठरेल, असे सूचित करत फडणवीस यांनी ते भविष्यातही सकारात्मक काम करत राहतील, असे म्हटले. त्यामुळे पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नवे वळण मिळाले आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांच्याकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




