चंदननगरमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयावरून महिलेची निर्घृण हत्या
वकील पतीसह पत्नी आणि मुलीला ६ तासांत बेड्या
1 मिनिट वाचन

वकील पतीसह पत्नी आणि मुलीला ६ तासांत बेड्या
पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, चंदननगर परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सहा तासांच्या आत मुख्य आरोपी वकील पतीसह त्याची पत्नी आणि मुलीला जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दिनेश मुन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी पूनम यांचे आरोपी अॅड. संजय दत्तात्रय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून अॅड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीने संगनमत करून पूनम यांच्या हत्येचा कट रचला. १६ एप्रिलच्या दुपारपासून १७ एप्रिलच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत, चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील अॅड. सावंत यांच्या कार्यालयात हा भीषण प्रकार घडला. आरोपी स्वाती सावंत आणि तिच्या मुलीने पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना अगतिक केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर क्रिकेटच्या बॅटने तसेच एका धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्यांची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अॅड. संजय सावंत (वय ४३) आणि त्याच्या मुलीला तातडीने ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य आरोपी स्वाती सावंत ही फरार होण्याच्या बेतात असताना, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिलाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकंद विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार करत आहेत.
Woman brutally murdered in Chandannagar on suspicion of love affair




