जेजुरीत २८ लाखांचा अनधिकृत चंदनाचा साठा जप्त
मांडकीत ५६० किलो ओंडक्यांसह आरोपी जेरबंद; दहशतवाद विरोधी शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई यशस्वी
2 मिनिट वाचन

मांडकीत ५६० किलो ओंडक्यांसह आरोपी जेरबंद; दहशतवाद विरोधी शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई यशस्वी
पुणे: मांडकी (ता. पुरंदर) येथील पाटील वस्ती परिसरात अनधिकृतपणे साठवून ठेवलेला २८ लाख ५ हजार २०० रुपये किमतीचा चंदनाचा साठा जेजुरी पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५६० किलो चंदनाचे ओंडके, कटर आणि दोन ड्रील मशिन हस्तगत करण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी शाखेच्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे.

याबाबत ओंकार लालासाहेब शिंदे (वय ३०, पोलीस कॉन्स्टेबल, दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रतीक प्रमोद खुटे (रा. मांडकी, पाटील वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ (सुधारणा १९८८) चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेतात लपवला होता चंदनाचा साठा
मिळालेल्या माहितीनुसार, मांडकी येथील विलास रावजी भोसले यांच्या शेतात चंदनाचा मोठा साठा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी प्रतीक खुटे याने ५६० किलो वजनाचे चंदनाचे लाकडी ओंडके अनधिकृतपणे साठवून ठेवल्याचे आढळून आले.
२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून २८ लाख रुपये किमतीचे ५६० किलो चंदनाचे लाकडी ओंडके, झाडे कापण्याचे कटर आणि दोन लोखंडी ड्रील असा एकूण २८ लाख ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने हे चंदन कोठून चोरून आणले होते आणि तो हे लाकूड कोणाला विकणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
वृक्षतोड करणाऱ्यांवर पोलिसांची नजर
पुरंदर तालुक्यात चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर चोरी आणि अनधिकृत वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे. वन संपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलीस हवालदार भोंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे क्राईम न्युज




