Ulhasnagar Murder News: उल्हासनगर हादरले! महापालिकेच्या सफाई कामगाराची भरदिवसा हत्या; पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचीही आत्महत्या
Ulhasnagar Latest Crime News : भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने केला वार; सीसीटीव्हीत कैद झाली थरारक घटना
1 मिनिट वाचन

Ulhasnagar Latest Crime News : भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने केला वार; सीसीटीव्हीत कैद झाली थरारक घटना
उल्हासनगर :- उल्हासनगर शहरात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कामगाराची कर्तव्यावर असतानाच निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा धक्का इतका भीषण होता की, पतीच्या निधनाची बातमी मिळताच पत्नीनेही आपले जीवन संपवले. या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
भररस्त्यात 'ऑन ड्युटी' रक्ताचा सडा
मयत महादू जगताप हे उल्हासनगर महापालिकेने ठेका दिलेल्या कोणार्क कंपनीकडे कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेक्शन 20 परिसरातील आनंद आईस्क्रीमजवळ साफसफाईचे काम करत होते. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचीही टोकाची पाऊल; परिसरात हळहळ
पतीच्या हत्येची बातमी घरी पोहोचताच त्यांची पत्नी पूर्वी महादू जगताप यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून त्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. एकाच दिवशी कुटुंबातील दोन व्यक्तींच्या अशा जाण्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सफाई कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
भरदिवसा आणि ड्युटीवर असताना कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "आम्ही सुरक्षित आहोत का?" असा प्रश्न सफाई कामगारांकडून विचारला जात असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




