पोलिसांनी सराईतांचा पाठलाग करून आवळल्या मुसक्या
येरवड्यातील फरार ‘डीजे’ जेरबंद, देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
2 मिनिट वाचन

येरवड्यातील फरार ‘डीजे’ जेरबंद, देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या लक्ष्मीनगर पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि थरारक कामगिरी करत विशेष शोध मोहिमेदरम्यान (कॉम्बिंग ऑपरेशन) येरवडा पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपींनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून उड्या मारून आजूबाजूच्या घरांच्या छतावरून आणि पत्र्यांवरून जीवाच्या आकांताने पळ काढला होता. मात्र, पोलीस अंमलदारांनी जीवाची परवा न करता घरांच्या पत्र्यांवरून पाठलाग करत दोघांना जेरबंद केले. संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर बाळगलेले एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस (राऊंड) जप्त करण्यात आले आहे. साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख असे अटक करण्यात आलेल्या मुख्य फरार गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे येरवड्यातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा हादरा बसला आहे.
संशयितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
या संदर्भातील धडाकेबाज कामगिरीबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, लक्ष्मीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख (वय २० वर्षे, रा. येरवडा) आणि शुभम राजेंद्र बोत (वय २६ वर्षे, रा. घोरपडी गाव) यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी साजिद शेख हा येरवडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११७(२), ११५(२), १८९(२), १९०, १९१(३), ३५२, ३५१(२) आणि आर्म्स ॲक्ट (बेकायदेशीर शस्त्र कायदा) कलम ४ व २५ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
गुप्त बातमीदाराकडून मिळाली गोपनीय माहिती
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष गस्त व तपास मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख आणि अमोल गायकवाड यांना त्यांच्या खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, येरवड्यातील गंभीर गुन्ह्यात अनेक दिवसांपासून फरार असलेला पाहिजे आरोपी साजिद ऊर्फ डिजे शेख हा कामराजनगर येथील त्याच्या राहत्या घरी गुपचूप येणार आहे.
ही खात्रीशीर माहिती मिळताच तात्काळ लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना घटनेचे गांभीर्य कळवण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, तपास पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने कामराजनगर परिसरातील आरोपीच्या घराजवळ जात पाळत ठेवून (रेकी करून) अत्यंत कडेकोट सापळा रचला.
दोन्ही संशयितांनी केला पलायनाचा प्रयत्न
पोलिसांचे पथक घराच्या दिशेने येत असल्याचे समजताच घरामध्ये लपून बसलेला मुख्य आरोपी साजिद आणि त्याचा साथीदार शुभम बोत हे दोघे पहिल्या मजल्याच्या खिडकीतून अत्यंत वेगाने बाहेर पडले. त्यांनी बाजूच्या खोलीच्या छतावर उड्या मारल्या आणि आजूबाजूच्या घरांच्या पत्र्यांवरून व स्लॅबवरून उड्या मारत पळू लागले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा थरारक पाठलाग केला आणि पत्रावरून पळणाऱ्या दोन्ही आरोपींना शिताफीने घेरून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी पंचांच्या समक्ष मुख्य संशयित आरोपी साजिद ऊर्फ डिजे शेख याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर आणि तांत्रिक चौकशीसाठी येरवडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.




