Mumbai News : NCP मध्ये मोठी राजकीय घडामोड! अमित शाहांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत महत्त्वाची बैठक; पक्षात नेमकं चाललंय काय?
Mumbai News :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
2 मिनिट वाचन

Mumbai News :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती आली असली, तरी पक्षातील महत्त्वाचे निर्णय खासदार पार्थ पवार घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
अमित शाहांसोबत दोन तास चर्चा; अर्थखात्याचा मुद्दा केंद्रस्थानी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती.https://maharashtramirror.com/ Mumbai News
या बैठकीत राज्यातील अर्थखात्याच्या मागणीवर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय पक्षातील सध्याची परिस्थिती आणि खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबतही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीला केवळ खातेवाटपापुरते मर्यादित न ठेवता पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे.
पार्थ पवारांच्या निर्णयांवर वरिष्ठ नेत्यांची नाराजी?
पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू होण्यामागे पार्थ पवार यांनी घेतलेल्या काही संघटनात्मक निर्णयांचाही संदर्भ दिला जात आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पार्थ पवार यांनी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या.
मात्र, अशा महत्त्वाच्या नियुक्त्या करताना पक्षाची कोअर कमिटी आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणे अपेक्षित होते, अशी भूमिका काही नेत्यांची असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत बैठक; काय ठरणार?
दरम्यान, दिल्लीत झालेल्या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींनंतर आता उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अलीकडच्या राजकीय घडामोडी पाहता पक्षाची संघटनात्मक स्थिती, आगामी राजकीय निर्णय आणि वरिष्ठ नेत्यांमधील समन्वय यावरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीत नेतृत्वाचा पेच सुटणार?
एकीकडे दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांची बैठक, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी बोलावलेली आमदारांची बैठक आणि त्यात पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेली चर्चा, या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा ऐरणीवर आले आहे.
सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत असताना पक्षातील निर्णयप्रक्रियेत कोणाची भूमिका निर्णायक ठरणार, वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जाणार का आणि पक्षातील मतभेदांवर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे देवगिरीवरील आजच्या बैठकीतून राष्ट्रवादीच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




