स्वारगेट येथे जनगणनेच्या कामावर गेलेल्या महिला कर्मचाऱ्यावर दगडफेक अन् विनयभंग
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली घटना; मोरे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल
3 मिनिट वाचन

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली घटना; मोरे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या पर्यवेक्षक व प्रगणक पथकावर पुण्यातील मीनाताई ठाकरे वसाहतीत झालेला जीवघेणा आणि पूर्वनियोजित हल्ला अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात २७ आणि २८ मे रोजी सलग दोन दिवस ही भयानक घटना घडली.

जनगणना करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून केवळ शिवीगाळ व दमदाटीच करण्यात आली नाही, तर दुसऱ्या दिवशी संपूर्ण पथकावर दगडफेक करत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये मनपाच्या ४८ वर्षीय महिला प्रगणक वनिता गोरखनाथ पाटोळे आणि त्यांचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विकास मोरे यांच्या कुटुंबातील ५ जणांसह इतर ४ ते ५ अनोळखी गुंडांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण पुणे महापालिका वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
२७ मे रोजी पहिली घटना
तक्रारदार वनिता पाटोळे या गेल्या १७ वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी शिपाई म्हणून कार्यरत असून, शासनाच्या आदेशानुसार त्यांच्याकडे राष्ट्रीय जनगणना २०२७ ची प्रगणक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २७ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्या मीनाताई ठाकरे वसाहतीमधील गल्ली क्रमांक १४ मध्ये जनगणनेची माहिती गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.
तेथील रहिवासी विकास नवनाथ मोरे यांच्या घरी गेल्या असता त्यांची पत्नी क्रांती मोरे हिने माहिती देण्यास नकार दिला व थेट शासकीय कामात अडथळा आणला. वनिता यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, क्रांतीने त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. मदतीसाठी धावून आलेले सहकारी प्रगणक धम्मानंद गायकवाड यांनाही मोरे कुटुंबाने धमकावले, त्यामुळे त्यांना तो दिवस काम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
२८ मे रोजी ‘कलेक्टर’ पथकावर खुनी हल्ला
मागील दिवशीचा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी आणि जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २८ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास वनिता पाटोळे यांच्यासोबत पर्यवेक्षक रमेश जाधव, अतिष चव्हाण आणि इतर प्रगणक अक्षय बाबर, श्रीकांत गनवादार, आकाश वाघमारे आणि वैष्णवी शेंडगे हे संपूर्ण पथक पुन्हा त्या वसाहतीत गेले.
सुरक्षेचा उपाय म्हणून वनिता यांचा तरुण मुलगाही त्यांच्यासोबत गेला होता. या पथकाने मोरे कुटुंबाला शासकीय कामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र आधीच्या वादाचा तीव्र राग मनात धरून विकास मोरे, त्याची पत्नी क्रांती मोरे, बहीण मुक्ता कसबे, आई लीलावती मोरे आणि पुतण्या अभिजीत मोरे या सर्वांनी पुन्हा आरडाओरडा सुरू केला.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून मनपा पथक तेथून निघून जात असताना, आरोपींनी त्यांच्यावर मागून धावून जात लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण सुरू केली.
हल्ल्यादरम्यान आरोपी विकास मोरे याने महिला प्रगणक वनिता पाटोळे यांचा हात पकडून त्यांच्या ब्लाउजची बाही फाडून विनयभंग केला. तसेच, त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, फास्ट्रॅक मनगटी घड्याळ आणि रेडमी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या मुलाला देखील या टोळक्याने जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले, तर एका आरोपीने त्याच्या हाताचा अंगठा चावून गंभीर जखमी केले. या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली.
संतप्त मनपा कर्मचाऱ्यांची महापौरांकडे धाव
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर भरदिवसा झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जखमी झालेल्या मुख्य जनगणना अधिकाऱ्यांनी आणि पीडित महिला कर्मचाऱ्याने आज पुणे महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांची महापौर कार्यालयात भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा थरार महापौरांना कथन केला.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि पुणे मनपा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले. “शासकीय कामात अडथळा आणणे, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणे आणि मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.




