मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : राज्यावर ‘आपत्ती’ सरकारची! तीन दिवसांच्या पावसाने उघड झाली ‘फेकनाथां’ची पोलखोल

Samna On Sarkar : सरकारच्या निष्क्रियतेवर 'सामना'तून ठाकरे गटाचा हल्ला; 'मुंबई बुडाली' म्हणणारे भाजपाचे पोपट आता कोणत्या बिळात लपले?

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

Samna On Sarkar : सरकारच्या निष्क्रियतेवर 'सामना'तून ठाकरे गटाचा हल्ला; 'मुंबई बुडाली' म्हणणारे भाजपाचे पोपट आता कोणत्या बिळात लपले? 'रेड अलर्ट' देऊन सरकारची जबाबदारी संपते का? ठाकरे गटाचा संतप्त सवाल.

मुंबई :- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्रातून म्हणजेच 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

"राज्यावर नैसर्गिक आपत्ती नव्हे, तर हे सरकार हीच एक 'आपत्ती' आहे," अशा शब्दांत ठाकरे गटाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी हे सरकार काय लढणार? असा सवाल करत तीन दिवसांच्या पावसाने सरकारची पोलखोल झाली असल्याचा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे.

'मुंबई खड्डेमुक्त करणार' दावे पोकळ

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. खड्ड्यांमुळे आधीच धोकादायक बनलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने धोका आणखी वाढला आहे. "यंदा मुंबई तुंबणार नाही, संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करू," असे दावे करणाऱ्या सरकारने केलेले सर्व दावे पोकळ असल्याचे या दोन दिवसांच्या पावसाने सिद्ध केले आहे, असे 'सामना'मध्ये म्हटले आहे. "मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना 'मुंबई बुडाली' अशी आवई उठवणारे भाजपाचे वाचाळवीर पोपट आता कोणत्या बिळात लपले आहेत?" असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

आपत्कालीन कक्ष झोपला होता का?

हवामान खात्याने 'रेड अलर्ट' दिल्यावर केवळ पत्रक काढून सरकार मोकळे झाले. पण जलमय होणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. "मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री असताना आणि मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करत होते? केवळ जनतेला 'रेड अलर्ट'चा इशारा दिला म्हणजे सरकारची जबाबदारी संपते का?" असे अनेक सवाल 'सामना'ने उपस्थित केले आहेत.

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

मुंबईसोबतच ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही अतिवृष्टीने थैमान घातले आहे. एकट्या मराठवाड्यातील शेतात पाणी शिरल्याने 2.80 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मागील नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नसताना केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या पंचनाम्यांनी शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार? असा संतप्त सवालही 'सामना'तून विचारण्यात आला आहे. यामुळे एकीकडे नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे सरकारची निष्क्रियता या संकटात भर घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

शेअर करा