Rohit Pawar : "दादांच्या निधनानंतर 18 व्या दिवशीच पक्षावर डल्ला मारण्याचा प्रयत्न"; प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर रोहित पवारांचे गंभीर आरोप
Rohit Pawar On Prafull Patel And Sunil Tatkare : अजित पवारांच्या घराबाहेर 'काळ्या जादू'चा प्रकार; सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून अधिकार लाटल्याचा दावा
2 मिनिट वाचन

Rohit Pawar On Prafull Patel And Sunil Tatkare : अजित पवारांच्या घराबाहेर 'काळ्या जादू'चा प्रकार; सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून अधिकार लाटल्याचा दावा
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर पक्षात मोठी उलथापालथ सुरू असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे केले आहेत. "अजितदादांना जाऊन अवघे 18 दिवस झाले असताना, सुनेत्रा काकी आणि पार्थ पवार यांना अंधारात ठेवून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला," असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे.
16 फेब्रुवारीचे 'ते' गुपित पत्र आणि निवडणूक आयोग
रोहित पवारांच्या दाव्यानुसार,16 फेब्रुवारी 2026 रोजी (अजितदादांच्या निधनानंतर 18 दिवसांनी) प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते.
अधिकार बळकावण्याचा प्रयत्न: या पत्रात पक्षाचे संविधान बदलल्याचे खोटे सांगून, कार्याध्यक्षांना (प्रफुल्ल पटेल) पक्षाचे पूर्ण अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती.
सुनेत्रा पवारांची धाव: हे प्रकरण लक्षात येताच नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, "दादांच्या अपघातापासून मी अध्यक्ष होईपर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार गृहीत धरू नये," अशी विनंती केली आहे.
नाशिकच्या भोंदू बाबाचा आणि 'काळ्या जादू'चा संदर्भ
रोहित पवारांनी या प्रकरणात 'अंधश्रद्धे'चा एक धक्कादायक कोन समोर आणला आहे. "अजितदादा हयात असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला होता. नाशिकच्या त्या भोंदू बाबाच्या (अशोक खरात) माध्यमातून हा प्रकार घडवून आणला का? पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे तंत्र-मंत्र केले जात होते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पीयुष गोयल यांचे वक्तव्य आणि 'ठरलेला' घटनाक्रम?
अजित पवारांच्या अपघातानंतर अवघ्या दोन दिवसांत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी "प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत" असे वक्तव्य केले होते (जे नंतर त्यांनी 'चूक' म्हणून सुधारले). यावर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला की, "27 तारखेची बैठक, अपघाताची वेळ आणि नेत्यांची वक्तव्ये पाहता, हा सर्व प्रकार आधीच ठरलेला होता का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे."
"राजकारण लै वंगाळ झालंय" - सुनेत्रा पवारांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना रोहित पवार म्हणाले, "काकी, राजकारण खूप घाणेरडे झाले आहे. तुमच्या अवतीभोवती जी माणसे आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. दादा आमदारांचे ऐकायचे, पण या नेत्यांचे ऐकत नसत, म्हणूनच त्यांना बाजूला सारण्याचा हा कट होता का?"
अंत्यविधीच्या वेळचा 'हेतू'
"जेव्हा दादांचा अंत्यविधी होत होता, तेव्हा हे नेते कोणत्या हेतूने तिथे आले होते? 27 तारखेच्या बैठकीला उशीर का झाला? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत," असे म्हणत रोहित पवारांनी या प्रकरणाच्या सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची गरज अधोरेखित केली आहे.




