Raju Sheety : "सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेत विरवले"; राजू शेट्टी यांचा अर्थसंकल्पावर घणाघाती हल्ला
निवडणूक आश्वासनांचा फज्जा: 'तकलादू' कर्जमाफीवरून राजू शेट्टी सरकारवर आक्रमक; शेती क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न
1 मिनिट वाचन

निवडणूक आश्वासनांचा फज्जा: 'तकलादू' कर्जमाफीवरून राजू शेट्टी सरकारवर आक्रमक; शेती क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न
मुंबई :- महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'सातबारा कोरा, कोरा, कोरा' अशी घोषणा करून शेतकऱ्यांची मते मिळवली, मात्र प्रत्यक्ष अर्थसंकल्पात केवळ २ लाखांपर्यंतची 'तकलादू' कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने: सबसिडीचा पत्ता नाही, केवळ 'दिवास्वप्ने'
अर्थमंत्र्यांनी 500 अब्ज डॉलर्सच्या कृषी जीडीपीचे जे लक्ष्य ठेवले आहे, त्याला राजू शेट्टी यांनी 'दिवास्वप्न' असे संबोधले आहे. ते म्हणाले की, "खरे तर शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, शेतमाल साठवणूक, प्रक्रिया उद्योग तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यावर सबसिडी देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. कृषी साहित्यावरील जीएसटी आणि महागाईमुळे शेतीचा खर्च असह्य झाला असताना, सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत आहे."
अटी-शर्तींचा सापळा: लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी' योजनेच्या घोषणेवर टीका करताना शेट्टी म्हणाले की, 2 लाखांच्या कर्जमाफीची घोषणा आकर्षक वाटत असली, तरी त्यामध्ये घातलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. या अटींमुळे खऱ्या गरजू शेतकऱ्याला न्याय मिळण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले जाणार असल्याचे ते म्हणाले.
पिकविमा योजनेबाबत सरकारने विमा कंपन्यांवर मेहेरबानी केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. "नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान भरपाई देण्यासाठी कोणताही ठोस आराखडा सरकारकडे नाही, उलट विमा कंपन्यांचे हित जपले जात आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. सरकारकडून वारंवार केल्या जाणाऱ्या 'एआय' (AI) आणि 'डिजिटल शेती'च्या दाव्यांना त्यांनी जमिनीवरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार म्हटले आहे. "शेतकरी आज नैसर्गिक संकटात होरपळत असताना त्यांना डिजिटल क्रांतीचे स्वप्न दाखवणे म्हणजे जमिनीवरच्या वास्तवापासून पळ काढण्यासारखे आहे," असेही ते म्हणाले.




