महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित हवे: महापौर
मंजूषा नागपुरे यांची पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
1 मिनिट वाचन

मंजूषा नागपुरे यांची पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
निलेश राऊत
पुणे: शहर व परिसरात झालेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही व इतर यंत्रणा सज्ज करा. महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित झाले पाहिजे, असे पत्र महापौर मंजूषा नागपुरे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे.

अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याअनुषंगाने महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे.
सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती करून ते कार्यान्वित करण्यात यावेत. पोलिसांनी शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पडताळणी सक्तीने करावी. नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पत्रातील प्रमुख मागण्या
शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी व नोंदणी प्रक्रिया राबवावी.
तपासणीशिवाय कोणालाही सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक देऊ नये. नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती मोहीम राबवावी.




