Pune Rain : कामं केलेल्या ८५ ठिकाणांचे थेट पावसातील फोटो दाखवा मंत्री मोहोळांकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती!
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

Pune Rain : सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष आणि नदीपात्रात फ्लड सेन्सर वाढवण्याच्या कडक सूचना
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Rain : केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची संख्या नेमकी किती कमी केलीत? आणि ज्या ८५ ठिकाणी कामं केल्याचा दावा करताय, तिथे यंदा पाणी का साचलं? असा संतप्त सवाल करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. (pune Rain flooding mohol questions PMC)
Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल
"पुणेकरांना त्रास होईल असं एकही ठिकाण शहरात राहता कामा नये, कागदी घोडे नाचवणं बंद करा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम दाखवा," अशा कडक शब्दांत मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यांच्या या अनपेक्षित आणि आक्रमक पवित्र्यामुळे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. Pune Rain

शहरात मान्सूनचे आगमन होताच पहिल्याच काही मुसळधार पावसात पुण्याची तुंबई झाल्याचे चित्र समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, दिल्लीहून परतताच केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी महापालिकेत तातडीची आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि गटनेते उपस्थित होते.
Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ७ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त
'त्या' ८५ ठिकाणांचे फोटो पुढच्या बैठकीत सादर करा!
बैठकी दरम्यान महापालिका प्रशासनाने शहरात एकूण १२० अतिसंवेदनशील (क्रिटिकल) पाणी साठणारी ठिकाणे असून, त्यापैकी ८५ ठिकाणांची कामे पूर्ण केल्याचा दावा केला. त्यावर मंत्री मोहोळ यांनी, "कामं झालेल्या ८५ पैकी किती ठिकाणी यंदा पाणी साचलं नाही, याची खात्रीशीर माहिती द्या?" असा प्रतिप्रश्न केला. यावर एकाही अधिकाऱ्याकडे ठोस उत्तर नव्हते. अधिकाऱ्यांची झालेली ही कोंडी पाहून मोहोळ यांनी थेट आदेश दिले की, "पुढच्या बैठकीत या सर्व ८५ ठिकाणांचे पाऊस सुरू असतानाचे ताजे छायाचित्रे (Photos) पुराव्यासह सादर करा, तरच कामाची सत्यता मानेल." Pune Rain

पावसाचा 'ट्रेंड' बदलला, तुमची तयारी काय?
"गेल्या काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस होण्याचा 'क्लायमेट ट्रेंड' बदलला आहे. ढगफुटीसदृश पाऊस होतोय, मग या बदलत्या संकटानुसार महापालिकेने कोणतं दीर्घकालीन नियोजन केलंय?" असा रोखठोक सवाल मोहोळ यांनी उपस्थित केला. "आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला जनतेला उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळे जुजबी मलमपट्टी न करता पुढच्या काही वर्षांचा विचार करून ठोस कृती आराखडा तयार करा. निधी कमी पडू दिला जाणार नाही, पण पुणेकरांना त्रास सहन करावा लागला तर गय केली जाणार नाही," असा थेट इशाराच त्यांनी दिला. Pune Rain
सिंहगड रस्ता आणि नदीपात्रासाठी 'ॲक्शन प्लॅन'
सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष चोवीस तास तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. तसेच, मुळा-मुठा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी 'फ्लड सेन्सर' ची संख्या तातडीने वाढवण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक पातळीवर वॉर्ड ऑफिसरनी नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
खड्ड्यांचा विषय निघताच महापालिका 'सज्ज' राहण्याचे आदेश
पावसामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, खड्ड्यांची माहिती मिळताच ते तातडीने बुजवण्यासाठी विशेष 'रॅपिड ॲक्शन' पथके तैनात ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले. Pune Rain

नागरिकांसाठी व्हॉट्सॲप नंबर सुरू होणार:
पुणेकरांना रस्त्यांवरील खड्ड्यांची थेट तक्रार महापालिकेपर्यंत सहज पोहोचवता यावी, यासाठी एक स्वतंत्र आणि समर्पित व्हॉट्सॲप क्रमांक त्वरित उपलब्ध करून देण्याची सूचना मोहोळ यांनी प्रशासनाला केली. पावसाळ्यात रस्ते आणि पाणी साचण्याच्या त्रासापासून पुणेकरांना तात्काळ दिलासा मिळाला नाही, तर गांभीर्याने कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.




