पुणे विषारी दारूकांड: २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे पोलीस दलातील तीन, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ६ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निलंबितांत समावेश; शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला
3 मिनिट वाचन
पुणे पोलीस दलातील तीन, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ६ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निलंबितांत समावेश; शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना तात्काळ आणि अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर दोन्ही पोलीस आयुक्तांनी तातडीने पावले उचलत, आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि बेकायदेशीर दारू पुरवठ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणात तत्परता दाखवून आपल्याच विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर बडगा उगारल्याबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या धडक कारवाईमुळे खात्यांतर्गत बेजबाबदारपणा करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे.
मध्यरात्री एका झटक्यात २२ अधिकारी निलंबित
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बेकायदेशीर आणि विषारी दारूच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलीस दलातील हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना सिकलगर आणि उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना हडपसर भागातील बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दापोडी आणि फुगेवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दापोडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह एक उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे (गुन्हे शोध) प्रमुख, फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित झाल्या असून, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आदेशात नमूद केल्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे.
त्यामुळे मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत तिघांनाही तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.
निलंबन काळात संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता, महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता मिळणार आहे. मात्र या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारल्यास निर्वाह भत्त्याचा हक्क गमवावा लागणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच निलंबन काळात कोणत्याही प्रकारची रजा मंजूर होणार नसून मुख्यालय सोडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज पुणे शहर नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्यदक्षतेचा अभाव दाखवल्याबद्दल विभागातील १३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यात ३ निरीक्षक, ६ उपनिरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
२० जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गेल्या दोन ते तीन दिवसांत हा थरार उघडकीस आला आहे. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत एकूण २० जणांचा या विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी १५ जणांचा मृत्यू पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी व दापोडी परिसरात झाला आहे, तर ५ जणांचा मृत्यू पुण्याच्या हडपसर येथील पांढरे मळा आणि काळे पडळ भागात झाला आहे. अजूनही ५ हून अधिक जणांवर पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मुख्य सूत्रधारासह ८ जणांना अटक; 'सीआयडी'कडे तपास
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत बेकायदेशीर दारूच्या पुरवठा साखळीतील मुख्य सूत्रधार आणि बुटलेगर योगेश वानखेडे आणि प्रजापती यांच्यासह ८ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी दारूमध्ये मिथेलॉन सारख्या अत्यंत घातक रसायनाचे जीवघेणे मिश्रण तयार केले होते, ज्याची पुष्टी फॉरेन्सिक अहवालात देखील झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६०० लीटरहून अधिक मिथेलॉनयुक्त दारू बाजारात पोहोचण्यापूर्वीच जप्त केली आहे.




