पुणे मनपाचा ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णय
कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ₹५ लाखांचे हक्काचे आर्थिक कवच आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
2 मिनिट वाचन

कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ₹५ लाखांचे हक्काचे आर्थिक कवच
आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
पुणे: आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आणि कर्मचारीभिमुख कल्याणकारी धोरणांनी देशात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी निधन झालेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना तब्बल ५ लाख रुपयांचे तातडीचे आर्थिक सहाय्य देण्याच्या महत्त्वपूर्ण धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुणे मनपाकडून अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांवर अचानक कोसळणाऱ्या संकटाच्या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत अशा प्रकारचे हक्काचे आणि मजबूत आर्थिक संरक्षण देणारी पुणे महानगरपालिका ही बहुदा संपूर्ण देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शासकीय सेवेत असताना प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अत्यंत मोठा आधार मिळाला आहे.
मनपा मुख्यालयामध्ये आदरयुक्त, भावूक सोहळा
या कल्याणकारी धोरणांतर्गत आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या शुभहस्ते मनपा मुख्यालयामध्ये एका आदरयुक्त आणि भावूक सोहळ्यात पात्र वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. कर्तव्य बजावत असताना दिवंगत झालेले पुणे मनपाचे कर्मचारी अशोक वाळके यांच्या वारसपत्नी श्रीमती कविता वाळके तसेच शशिकांत दिघे यांच्या वारसपत्नी श्रीमती राजश्री दिघे यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा धनादेश अत्यंत सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. अचानक कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरादरम्यान पुणे महानगरपालिकेने दाखवलेली ही सामाजिक संवेदनशीलता आणि दिलेले तात्काळ आर्थिक बळ वाळके व दिघे कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा सहारा ठरले आहे.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगाप्पा कोळी यांच्यासह दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, “पुणे महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी हा मनपा कुटुंबाचा मुख्य हिस्सा आहे. कर्तव्य बजावताना त्यांच्यावर ओढवलेला दुर्दैवी प्रसंग संपूर्ण मनपा कुटुंबाला चटका लावून जातो. अशा वेळी त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी हे हक्काचे आर्थिक कवच मनपाने सुरू केले असून, याची संपूर्ण पारदर्शकतेने अंमलबजावणी केली जाईल.” या ऐतिहासिक धोरणामुळे मनपाच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




