औताडे-हांडेवाडीतील भागातील नागरिकांचे जनआंदोलन
६००० पेक्षा जास्त कुटुंबांचा संताप; ८ मे रोजी उपोषण व ९ मे ला आंदोलन करणार
1 मिनिट वाचन

६००० पेक्षा जास्त कुटुंबांचा संताप; ८ मे रोजी उपोषण व ९ मे ला आंदोलन करणार
दरवर्षी २७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत कर व मेंटेनन्ससाठी खर्चून सुद्धा पाणी, ड्रेनेज या सुविधांपासून वंचित; वीज पुरवठा वारंवार खंडित
पुणे: औताडे-हांडेवाडी परिसरातील ६,००० पेक्षा अधिक कुटुंबांनी मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करूनही पाणी, ड्रेनेज, रस्ते व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांनी २८ एप्रिल रोजी यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या ऑफिसमध्ये निवेदन दिलेले असताना सुद्धा ४ मेपर्यंत पुणे महानगरपालिकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी साखळी उपोषण आणि ९ मे रोजी त्रस्त नागरिक पुणे महानगरपालिका व एमएसईबी यांची प्रतिकात्मक अंतयात्रा तसेच ठिय्या आंदोलन करतील अशी माहिती त्यांचे प्रतिनिधी आशिष इंगळे, आनंद कांबळे, विनोद शिंदे आणि प्रणय पाटील यांनी दिली.
सरकारी यंत्रणांना स्पष्ट इशारा देऊन ते म्हणाले, “आता ही केवळ तक्रार नाही, हा आमच्या हक्कासाठीचा लढा आहे.”
आंदोलन पूर्णपणे शांततेत व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यात येणार असून, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.




