Prakashrao Abitkar : राज्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव! पण घाबरू नका – तो आता ‘नवीन नॉर्मल’चा भाग : आबिटकर
• राज्यात 494 सक्रिय रुग्ण; बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह – प्रतिकारशक्ती अधिक बळकट
1 मिनिट वाचन

•राज्यात 494 सक्रिय रुग्ण; बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह – प्रतिकारशक्ती अधिक बळकट
मुंबई :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार हळूहळू वाढू लागला असला तरी नागरिकांनी घाबरू नये, असं स्पष्ट विधान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. “कोरोना आता आपल्या जगण्याचाच भाग झाला आहे. काळजी घ्या, पण भीती पसरवू नका,” असं ते म्हणाले.
माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात 494 सक्रिय कोरोना रुग्ण असून देशभरात हे प्रमाण 4,300 पेक्षा अधिक आहे. मात्र यामध्ये बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांसह बरे होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की, “फक्त कोरोना असल्यामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मृत्यू झालेले रुग्ण अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त होते.”
ते पुढे म्हणाले, “आपली प्रतिरोधक शक्ती आता अधिक बळकट आहे. त्यामुळे कोरोना वाढत असला तरी तो आपल्याला धक्का देणार नाही. फक्त ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनविकार किंवा हृदयविकार आहेत त्यांनी अधिक दक्ष राहावं.”
केरळ, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य विभाग केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार काम करत असून, आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरतेशेवटी, “घाबरून न जाता मास्क वापरणं, गर्दी टाळणं, आणि नियमित आरोग्य तपासणी करणं ही खबरदारी महत्वाची आहे,” असं आवाहन आबिटकर यांनी जनतेला केलं आहे.
हेही वाचा: 'फिक्सर पीए'चा डाव उधळणार? गृह विभागाचा मोठा निर्णय




